मुदतवाढीवरून सरकार व भाजप यांच्या चर्चेत सापडलेल्या रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांची चांगलीच पाठराखण त्यांचे पूर्वाश्रमीचे डी. सुब्बराव यांनी सोमवारी केली. आपल्या ‘हू मूव्ह माय इंटरेस्ट रेट?’ या बहुचर्चित पुस्तकाच्या निमित्ताने सुब्बराव यांनी राजन हे पुन्हा या पदावर राहिल्यास ते भारताकरिता आणि भारतीय अर्थव्यवस्थेसाठी लाभदायी ठरेल, असे वक्तव्य केले.
राजन यांच्यापूर्वी गव्हर्नरपदाची कारकिर्द भूषविणाऱ्या सुब्बराव यांनाही काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या कालावधीत मुदतीनंतर अतिरिक्त कालावधी मिळाला होता.
अर्थशास्त्रीय पाश्र्वभूमी नसणारी व्यक्तीही त्याच्याकडे गुणवत्ता व नेतृत्वगुण असल्यास रिझव्‍‌र्ह बँकेसारख्या देशातील सर्वात जुन्या व सर्वोच्च अशा वित्त नियामक यंत्रणेचा कारभार हाकू शकते, असे नमूद करत सुब्बराव यांनी, अशी व्यक्ती जर अर्थतज्ज्ञ असेल तर मुदतवाढीबाबत फार चर्चा ताणणे योग्य होणार नाही, असे स्पष्ट केले.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख ख्रिस्टाईन लागार्ड यांचा दाखला देत सुब्बराव यांनी, अर्थतज्ज्ञ नसूनही ही महिला त्या पदावर उत्तम कार्य करत असल्याचे सांगितले. तेव्हा प्रशासनातील व्यक्तीही चांगली काम करू शकते, असे ते म्हणाले.