‘आपली मते ठामपणे मांडा, त्याचे सकारात्मक परिणाम निश्चितच दिसतील,’ असे सांगत विद्यार्थ्यांचे उद्बोधन आणि जागतिक अर्थकारणावर कटाक्ष असे एकाच प्रतिपादनात दुहेरी उद्दिष्ट साधण्याची कसरत रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांना गुरुवारी करावी लागली. जागतिक अर्थकारणात भारताची ‘दादा’ भूमिकेबद्दल आग्रही असलेल्या राजन यांनी सेंट झेवियर्स महाविद्यालय ‘मल्हार’ या वार्षिकोत्सवादरम्यान विद्यार्थ्यांशी संवाद साधताना या भूमिकेचा पुनरूच्चार केला. पाश्चिमात्य राष्ट्रांकडून आपल्या हितसंबंधांची दखल घेतली जाईल, या अपेक्षेपेक्षा भारतासारख्या उदयोन्मुख राष्ट्रांचा जागतिक आर्थिक विषयसूची ठरविण्यासाठी आक्रमकपणे पुढाकार अत्यावश्यक बनला असल्याचे राजन यांनी प्रतिपादन केले. ‘उदयोन्मुख ते महाकाय राष्ट्रांपर्यंत संक्रमण घडून येते, मात्र जागतिक पटलावरील आर्थिक विषय व घटनाक्रमांवर मात्र कोणताही प्रभाव तरीही नसावी, ही एक आपली मोठी उणीव दिसून येते,’ असे मत राजन यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमादरम्यान त्यांना महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनेच रेखाटलेले रेखाटलेले चित्रही भेट स्वरूपात देण्यात आले.