सध्या कायदाबाह्य़ गुंतवणूक व्यवहाराच्या गुन्ह्य़ाखाली गजाआड असलेले गोल्डमन सॅक्सचे माजी संचालक रजत गुप्ता यांना फार मोठा दिलासा मिळाला आहे. २०१२ सालच्या न्यायालयीन आदेशाची फेरसुनावणी करण्याच्या त्यांच्या अपिलाला मंजुरी मिळाली आहे.
मॅनहॅटनस्थित दुसऱ्या अमेरिकी अपील न्यायालयाने गुप्ता यांच्या फेरसुनावणीच्या अपिलाला गुरुवारी मंजुरी दिली. मॅकिन्सी अँड कंपनीचे जागतिक व्यवस्थापकीय संचालक म्हणून कारकीर्द राहिलेल्या गुप्ता यांना दोन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ‘इनसायडर ट्रेडिंग’ यासारख्या गंभीर गुन्ह्य़ात अमेरिकेतील उद्योगक्षेत्रातील सिद्धदोष उच्चाधिकारी म्हणून गुप्ता यांचे प्रकरण बहुचर्चित राहिले आहे. आपल्या शिक्षेविरुद्ध गुप्ता यांनी अगदी अमेरिकी सर्वोच्च न्यायालयापर्यंत दाखल केलेले अपील या अगोदर फेटाळण्यात आले आहे. गुप्ता संचालकपद भूषवीत असलेल्या गोल्डमन सॅक्स या कंपनीसंबंधाची गोपनीय आणि समभागाच्या किमतीच्या दृष्टीने संवेदनशील माहिती आपल्या दलाल मित्र गॅलीयन समूहाचे राज राजरत्नम यांना आगाऊ पुरवून, त्या आधाराने समभागांचे व्यवहार करून मोठा आर्थिक लाभ कमावण्याच्या अर्थात इनसायडर ट्रेडिंगच्या गुन्ह्य़ासाठी त्यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यांचे सहकारी राजरत्नम याच गुन्ह्य़ासाठी २०११ सालच्या निकालानुसार, ११ वर्षांच्या कारावासाची शिक्षा भोगत आहेत.