ई-कॉमर्समधील वैयक्तिक गुंतवणुकीचा शिरस्ता टाटा सन्सचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांनी नव्या वर्षांतही कायम ठेवला आहे. श्वानविषयक सर्व माहिती व खाद्यान्नाबाबतची माहिती पुरविणाऱ्या डॉगस्पॉट.इन मध्ये टाटा यांनी गुंतवणूक केली आहे.
डॉगस्पॉट.इनमधील टाटा यांची नवी गुंतवणूक रक्कम जाहीर करण्यात आली नाही. मात्र त्यांनी ती केल्याचे कंपनीचे सह संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी राणा अथेया यांनी स्पष्ट केले आहे. टाटा यांच्याबरोबरच प्रसिद्ध चित्रपट निर्माते रॉनी स्क्रूवाला हेही कंपनीचे एक गुंतवणूकदार आहेत.
टाटा यांनी यापूर्वी स्नॅपडिल, कार्याह, अर्बन लॅडर, ब्ल्यूस्टोन, कारदेखो, सबसे टेक्नॉलॉजीज्, शिओमी तसेच ओला आदी ई-कॉमर्समधील कंपन्यांमध्ये वैयक्तिक गुंतवणूक केली आहे.
टाटा सन्सचे अध्यक्ष म्हणून डिसेंबर २०१२ मध्ये निवृत्त झाल्यानंतर रतन टाटा यांचा नव उद्यमी कंपन्यांमधील कल वाढत गेला. त्यानंतर त्यांनी अशाच काही कंपन्यांचे सल्लागार म्हणूनही भूमिका वठविली. डॉगस्पॉट.इनला टाटांच्या गुंतवणुकीसाठी टेक्टर कॅपिटलने सल्ला दिला. स्वत: रतन टाटा हे एक श्वानप्रेमी आहेत. डॉगस्पॉट.इन ही ई-कॉमर्स मंचावरील नव उद्यमी कंपनी आहे. कंपनीत यापूर्वी इशिगो.कॉमचे आलोक बाजपेयी, निंबुझचे विकास खन्ना, आनंद लुनिया यांची कोशेन्ट, के. गणेश यांची ग्रोथ स्टोरी आदींनी गुंतवणूक केली आहे.
जागतिक श्वान निगा बाजारपेठेने २०१४ मध्ये १०० अब्ज डॉलरचा टप्पा ओलांडला असून भारतातील ही बाजारपेठ वार्षिक १.२२ अब्ज डॉलरची आहे. येथे ती वार्षिक ३० टक्के दराने वाढते आहे. देशातील श्वानांची संख्या ४० लाख गणली जाते.