चहा व्यवसायातील नवउद्यमी टीबॉक्समध्ये रतन टाटा यांनी आपली नवी वैयक्तिक गुंतवणूक केली आहे. टाटा समूहाप्रमाणे जागतिक स्तरावर कंपनीला नेण्यासाठी रतन टाटा यांचे मार्गदर्शन आम्हाला नक्कीच मिळेल, असा विश्वास यानिमित्ताने टीबॉक्सचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी कौशल दुगर यांनी व्यक्त केला. टाटा यांच्या नव्या गुंतवणुकीच्या आधारावर कंपनी जागतिक क्षेत्रात कंपनीचा विस्तार करेल, असेही दुगर म्हणाले.
२०१२ ची स्थापना असलेली टीबॉक्स ही कंपनी भारतातील दार्जिलिंग, आसाम, निलगिरी तसेच नेपाळमधील चहा जगभरात निर्यात करते. कंपनीद्वारे विविध ९३ देशांमध्ये चहाची पोच होते. टाटा यांच्या नव्या गुंतवणुकीची रक्कम अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
रतन टाटा यांनी यापूर्वी स्नॅपडील, कार्याह, उर्बन लॅडर, ब्ल्युस्टोन, कारदेखो, सबसे टेक्नॉलॉजिज, शिओमी, ओला आदी नवउद्यमी कंपन्यांमध्ये वैयक्तिक गुंतवणूक केली आहे. कलारी कॅपिटल, जंगल व्हेंचर्ससारख्या ई-कॉमर्समधील कंपन्यांच्या संचालक मंडळावर रतन टाटा हे सल्लागार म्हणूनही आहेत.