* रेपो दरात पाव टक्का कपातीने कर्ज स्वस्त होणार
* सीआरआर घटल्याने बँकांसाठी १८००० कोटींचा निधी खुला होणार
अर्थ-उद्योगजगतासह राजकीय पातळीवरूनही जशी अपेक्षा केली जात होती, त्याप्रमाणे रिझव्‍‌र्ह बँकेने मंगळवारी जाहीर केलेल्या तिमाही पतधोरणात रेपो तसेच सीआरआर हे प्रमुख दर प्रत्येकी पाव टक्क्याने कमी केल्याने अन्य वाणिज्य बँकांही त्यांचे गृह तसेच वाहन कर्ज अधिक स्वस्त करू शकतील. यापूर्वी वेळोवेळी चढय़ा महागाई दराची चिंता वाहणारे आणि गव्हर्नरपदाची मुदतवाढ मिळालेले डी. सुब्बराव यांनी व्याजाचे दर ओसरणीला लागण्याच्या पर्वाची नांदी करतानाच, दुहेरी वित्तीय तुटीबद्दल सरकारकडून आळवल्या गेलेल्या चिंतेच्या सूरात सूर मिळविला आहे. तब्बल नऊ महिन्यानंतर रिझव्‍‌र्ह बँकेकडून वाणिज्य बँकांना दिल्या जाणाऱ्या अल्पमुदतीच्या कर्जाचा दर अर्थात रेपो दर कमी केला गेला आहे.

कर्ज स्वस्त होणे शक्य
नऊ महिन्यानंतर कपात झालेल्या रेपो दरामुळे उद्योगधंद्यांना तसेच व्यक्तिगत ग्राहकांसाठी कर्जाचे दर स्वस्त होतील. रिझव्‍‌र्ह बँकेने रेपो दर पाव टक्क्याने कमी करत तो ७.७५ टक्के करण्यात आणला आहे. तर बँकांना आपल्या ठेवींतील रिझव्‍‌र्ह बँकेकडे ठेवावा लागणारा हिस्सा अर्थात रोख राखीव प्रमाण (सीआरआर) पाव टक्क्यांनी घटवून ४ टक्क्यांवर आणला गेला आहे. यातून  बँकांकडे अतिरिक्त १८,००० कोटी रुपये उपलब्ध होणार आहेत. यामुळेही बँका अधिक प्रमाणात वित्तपुरवठा करू शकतील. सीआरआरमधील कपात ९ फेब्रुवारीपासून लागू होईल. रेपोतील बदलामुळे बँकांकडून अल्पमुदतीच्या कर्ज उचलीवर रिझव्‍‌र्ह बँकेला द्यावा लागणारा व्याजाचा दर अर्थात रिव्हर्स रेपो दरही त्याच प्रमाणात कमी होऊन तो ६.७५ टक्के झाला आहे. तर बँक दरही ८.७५ टक्के असा आपोआप सुधारला आहे. मध्यवर्ती बँकेचे आगामी मध्य तिमाही पतधोरण १९ मार्च रोजी तर नव्या आर्थिक वर्षांचे पतधोरण ३ मे रोजी जाहीर होणार आहे.
भर वित्तीय तूट रोखण्यावर
तिमाही पतधोरण जाहीर करताना गव्हर्नर डी. सुब्बराव यांनी पाच जोखीमांचा ठळक उल्लेख केला. याचबरोबर त्यांनी केवळ महागाईशी संबंधित सहा विविध बाबींवरही प्रकाश टाकला. अन्नधान्याची महागाई, डिझेलची दरवाढ, जागतिक बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमती, देशातील कोळशाचे चढे दर, ग्रामीण भागातील वेतनावरील खर्च तसेच ऐतिहासिक टप्प्यावर पोहोचलेली वित्तीय तूट यांचा त्यांनी त्यात समावेश केला. भारतीय अर्थव्यवस्थेला बळकटी आणण्यासाठी केंद्र सरकारकडून उचलले गेलेल्या किराणा, हवाई, प्रसारमाध्यम आदी क्षेत्रातील वाढीव थेट विदेशी गुंतवणूक मर्यादा; विनियंत्रित इंधन दर, गार कर-प्रक्रिया आदींचे त्यांनी कौतुक केले. सरकारसाठी डोकेदुखी ठरणाऱ्या चालू खात्यातील तूट कमी करण्याचा प्रयत्न म्हणून गुंतवणुकीला चालना देण्याचा प्रयत्न यंदाच्या पाव टक्क्याच्या दरकपातीने होत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच देशाचा विकास दर यापुढील कालावधीत कमी अंदाजला असला तरी महागाई आणखी कमी होऊन मार्चच्या पतधोरणात व्याजदर कपातीच्या आणखी एका फैरीचे सूतोवाचही त्यांनी केले.

पतधोरणाची ठळक वैशिष्टय़े
*  महागाई दर कमी होण्याबाबत आशा; मार्चअखेर ६.८ टक्क्यांवर स्थिरावण्याचा अंदाज
* आर्थिक विकासदराचा २०१२-१३ साठीचा अंदाज मात्र ५.८ टक्क्यांवरून खुंटवून ५.५ टक्के

गव्हर्नर सुब्बराव यांनी व्यक्त केलेल्या ठळक जोखमा

* चालू खात्यातील वाढती तूट
* जागतिक बिकट आर्थिक स्थिती
* सलग तीन वर्षे चढा महागाई दर
*  घटती गुंतवणूक व बचतदराची चिंता
*  बँकांचे वाढते बुडीत कर्ज

कर्ज स्वस्ताईचा लाभ हप्त्यात माफक सूट
मुख्य व्याजदर पाव टक्क्याने कमी झाल्याने बँकाही आता त्याचा लाभ लवकरच कर्जदारांपर्यंत पोहोचवतील. राष्ट्रीयीकृत आयडीबीआय बँकेने आधार दरात (बेस रेट) पाव टक्क्यांनी कमी करण्याची लगोलग घोषणाही केली
वाणिज्य बँकांनीही किमान पाव टक्क्याने विविध व्याजदर कमी केले तरी त्याचा ग्राहकांना मिळणारा लाभ असा असेल –

                                    गृह कर्ज                                                       वाहन कर्ज
                               (रु.२०लाखांसाठी                                         (रु.५लाखांसाठी
                               १० वर्षे मुदतीकरिता)                             ५ वर्षे मुदतीकरिता)
सध्याचा मासिक हप्ता      रु. २०,६४३                                              रु. ११,१३३        
संभाव्य मासिक हप्ता      रु. २०,३०५                                                रु. ११,०७२
महिन्याची बचत                 रु. ३३८                                                     रु. ६१    

स्वागत
रिझव्‍‌र्ह बँकेच्या व्याजदर कपातीच्या निर्णयाचे निश्चितच स्वागत आहे. तळाला गेलेल्या अर्थव्यवस्थेच्या उभारीसाठी गुंतवणूकपूरक पावले उचलणे आवश्यकच होते. सरकार वित्तीय तूट कमी करण्यासाठी उपाययोजना करीतच आहे. मात्र व्याजदर कपातीमुळे दीर्घकालीन परिणाम होणार असून मोठय़ा प्रमाणात वित्त पुरवठय़ासाठीही मदत होईल.* मॉन्टेकसिंग अहलुवालिया
नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष

रिझव्‍‌र्ह बँकेच्या अर्धा टक्का व्याजदर कपातीमुळे गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळून महागाई आटोक्यात आणण्यासह मदत होईल. मध्यवर्ती बँकेने खूपच समतोल निर्णय घेतला आहे. महागाई कमी करण्याबरोबरच अर्थव्यवस्थेच्या विकासाला हातभार लावण्याचा प्रयत्न झाला आहे. महागाई आणखी कमी झाल्यास व्याजदर अधिक कमी होऊ शकतील.  –  सी. रंगराजन, पंतप्रधानांचे मुख्य सल्लागार.


ग्राहक आणि गुंतवणूकदार या दोहोंना सांभाळून घेण्याचा प्रयत्न यंदाच्या पतधोरणातून झाला आहे. सध्या असलेली कमी मागणी आणि गुंतवणूक पाहता दर कपातीमुळे त्याला चालना मिळेल. सरकारने यापूर्वीच आर्थिक उन्नत निर्णयांची पावले उचलली आहेत. आता रिझव्‍‌र्ह बँकेनेही त्याला साथ दिली आहे.
– चंद्रजीत बॅनर्जी,
महासंचालक, सीआयआय

रेपो आणि सीआरआर अशा दोन्हीतील दर कपातीमुळे बँकांमार्फत उद्योगांना होणारा पतपुरवठा अधिक वाढेल. आणि हे अर्थव्यवस्थेसाठीही आवश्यकच होते. चालू आर्थिक वर्षांतील पहिल्या आठ महिन्यातील   अवघा एक टक्क्याचा औद्योगिक उत्पादनाचा दर पाहता उद्योगाला या निर्णयामुळे उभारी मिळेल.
– एम. रफिक अहमद
    ‘फिओ’चे प्रमुख