बहुप्रतीक्षित दहा वष्रे मुदतीच्या केंद्र सरकारच्या रोख्यांच्या विक्रीची प्रक्रिया रिझव्‍‌र्ह बँकेने शुक्रवारी पूर्ण केली. केंद्र सरकारच्या वतीने दर शुक्रवारी रिझव्‍‌र्ह बँक रोखे विक्री करून कर्ज उभारणी करीत असते. या आठवडय़ात रिझव्‍‌र्ह बँकेने या रोख्याद्वारे ९,००० कोटी उभारण्याचे जाहीर केले होते. प्रत्यक्षात ३३ हजार कोटी रुपयांच्या रोख्यांना मागणी नोंदविली गेली. परिणामी या रोख्यांवर देय असलेल्या व्याजाचा दर ७.७२ टक्के जाहीर करण्यात आला.
एप्रिल महिन्यात रिझव्‍‌र्ह बँकेने दहा वष्रे मुदतीचे रोखे विकणार असल्याचे जाहीर केल्यापासून या लिलावाबाबत बँका, विमा कंपन्या म्युच्युअल फंडांमध्ये उत्सुकता होती. या आधी २०२४ मध्ये मुदतपूर्ती असलेला व ८.४० टक्के दराने व्याज देय असलेला रोखा दहा वष्रे मुदतीचा रोखा समजला जात होता. आजपासून नवीन रोखा जारी केल्याने २०२५ मध्ये मुदतपूर्ती असलेला व ७.७२ टक्के व्याज देय असलेला रोखा दहा वष्रे मुदतीचा समजला जाईल.    
मागील दोन महिन्यांत जगभरात वेगवेगळ्या अर्थव्यवस्थांच्या दहा वष्रे मुदतीच्या रोख्यांत वाढ झाली. अमेरिकेत फेडच्या दहा वष्रे मुदतीच्या रोख्यांचा दर २.१२ टक्क्यांवरून २.६२ टक्के, जर्मनीच्या रोख्यांचा दर ०.२ टक्क्यावरून ०.६५ टक्के, चीनच्या दहा वष्रे मुदतीच्या रोख्यांच्या व्याजदरात २.९६ टक्क्यांवरून ३.२४ टक्के इतकी वाढ झाली, तर ऑस्ट्रेलियाच्या दहा वष्रे मुदतीच्या रोख्यांचे व्याजदर २.२८ टक्क्यांवरून २.९६ टक्के झाले. याचे प्रतििबब भारत सरकारच्या रोख्याच्या किमतीतही दिसून आले.
परकीय गुंतवणूकदारांच्या कररचनेबाबत उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त होत असल्याने विदेशी अर्थसंस्थांनी आपली देशांत गुंतलेली पुंजी मागे घेताना, प्रामुख्याने दहा वष्रे मुदतीच्या रोख्याची मोठय़ा प्रमाणात विक्री केली होती. एप्रिल महिन्याचा किरकोळ महागाईचा दर कमी झाल्याने रोख्यांच्या व्याजदरातही घट दिसून आली.
प्रत्येक आठवडय़ात कोणत्या मुदतीचे रोखे विकणार याची घोषणा रिझव्‍‌र्ह बँकेकडून सोमवारी होत असते. मागील सोमवारी ना रिझव्‍‌र्ह बँकेकडून ना अर्थमंत्रालयाकडून घोषणा झाल्याने  शुक्रवारी रोख्यांचा लिलाव होणार किंवा नाही याबद्दल साशंकता होती. रिझव्‍‌र्ह बँकेकडे असलेल्या केंद्र सरकारच्या खात्यात ९८,३५२ कोटी रुपये जमा असल्याने या आठवडय़ात लिलाव करू नये, या मताचे अर्थमंत्रालयातील काही अधिकारी होते. अखेर मंगळवारी रिझव्‍‌र्ह बँक २०२५ मध्ये मुदतपूर्ती असलेल्या रोख्यांची विक्री करणार असल्याचे जाहीर करण्यात आले.

‘‘आम्हाला रोख्यांवर ७.७२ ते ७.७५ टक्के व्याजदराची अपेक्षा होतीच. दहा वष्रे मुदतीच्या भारतीय रोख्यांना मोठी मागणी असल्याने रोखे गुंतवणूक करणाऱ्या निधी व्यवस्थापकांमध्ये हे रोखे विकत घेण्यासाठी मोठी चढाओढ दिसून आली. रिझव्‍‌र्ह बँक पुढील महिन्याभरात पुन्हा याच रोख्यांची विक्री करण्याची अपेक्षा आहे.’’
-मूर्ती नागराजन, निधी व्यवस्थापक, क्वांटम म्युच्युअल फंड    

 ‘‘एप्रिल महिन्यात किरकोळ किमतीवर आधारित महागाईचा दर ४.८७ होता जो रिझव्‍‌र्ह बँकेने मार्च २०१६ साठी अपेक्षिलेल्या ५.८ टक्के या सुसहय़ दरापेक्षा कमी आहे. याचे प्रतििबब नवीन दहा वष्रे मुदतीच्या रोख्यांच्या आजच्या उत्साही लिलावात दिसून आले. येत्या २ जूनला जाहीर होणाऱ्या पतधोरणात रिझव्‍‌र्ह बँक रेपो दरात कपात करू शकेल, असा विश्वासही यातून दिसतो.’’
-किलोल पंडय़ा, निधी व्यवस्थापक, एलआयसी नोमुरा म्युच्युअल फंड