डेक्कन क्रॉनिकल या सध्या दिवाळखोर माध्यम समूहाला कर्ज देताना योग्य मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न केल्याबद्दल, रिझव्‍‌र्ह बँकेने आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँकेसह १२ बँकांवर एकूण दीड कोटींचा दंड आकारला आहे. या समूहाने या बँकांचे सुमारे ४००० कोटींचे कर्ज थकविले आहे. देशात गंभीर बनलेल्या थकीत कर्जाच्या संबंधाने झालेली ही पहिलीच लक्षणीय कारवाई आहे.
डेक्कन क्रॉनिकल होल्डिंग लि.च्या विविध बँकांच्या शाखांमधील सर्व कर्ज आणि चालू खात्यावर उलाढालींची छाननी रिझव्‍‌र्ह बँकेने २०१३ सालच्या उत्तरार्धात केली आहे. त्यानंतर या समूहाला कर्ज देणाऱ्या बँकांना कारणे दाखवा नोटीसा धाडल्या गेल्या. मार्च २०१४ मध्ये धाडण्यात आलेल्या नोटीसांवर बँकांनी सादर केलेल्या लेखी उत्तरांचा अभ्यास करून रिझव्‍‌र्ह बँकेने नियमांचे उल्लंघन झाल्याचा निष्कर्ष निश्चित करून सदर आर्थिक दंडांचा निर्णय घेतला.
आयसीआयसीआय बँकेला ४० लाखांचा दंड
सर्वाधिक ४० लाखांचा दंड आयसीआयसीआय बँकेवर, अ‍ॅक्सिस आणि आयडीबीआय बँकेवर प्रत्येकी १५ लाख, कॅनरा, कॉर्पोरेशन, इंडसइंड, कोटक महिंद्र, स्टेट बँक ऑफ हैदराबाद आणि येस बँकेवर प्रत्येकी १० लाखांचा, तर एचडीएफसी, रत्नाकर बँकेवर प्रत्येकी ५ लाखांचा दंड रिझव्‍‌र्ह बँकेने आकारला आहे. दंड वसुली म्हणजे या बँकांनी संबंधित कर्जदाराशी केलेल्या व्यवहारांना वैध ठरविणारी कृती नसल्याचेही रिझव्‍‌र्ह बँकेने स्पष्ट केले आहे.