‘तुमचा ग्राहक जाणून घ्या’ अंतर्गत कायदेशीर बाबींची पूर्तता न केले प्रकरणात रिझव्‍‌र्ह बँकेने देशातील आघाडीच्या एचडीएफसी बँकेला २ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. तर गेल्या वर्षांतील ६,१०० कोटी रुपयांच्या गैर व्यवहार प्रकरणात सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ बडोदाला ५ कोटी रुपयांचा दंड जाहीर झाला आहे.
प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या ऑक्टोबर २०१५ च्या वृत्ताच्या अहवाल आधारावर एचएडएफसी बँकेवर यंदा कारवाई करण्यात आली आहे. यासाठी बँकेचे ‘तुमचा ग्राहक जाणून घ्या’ (केवायसी) योग्यरितीने होत आहे की नाही हे तपासल्यानंतर मध्यवर्ती बँकेने ही कारवाई केली. याबाबत बँकेला रिझव्‍‌र्ह बँकेने नोटिस पाठविली असून त्यावर उत्तर देण्यास बजाविण्यात आले आहे. बँकेने अंतर्गत व्यवहार अधिक सुयोग्य करण्यासाठी पावले उचलली असून असे प्रकार पुन्हा घडणार नाही, याबाबत काळजी घेतली जाईल, असे स्पष्ट केले आहे.
सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ बडोदातील ६,१०० कोटी रुपयांचा गैरव्यवहार उघड झाल्यानंतर बँकेच्या ताळेबंदाचा हिशेब केल्यानंतर बँकेवरील ५ कोटी रुपयांच्या कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे. बँक व्यवस्थापनादेखील याबाबत सावधगिरीचे आश्वासन रिझव्‍‌र्ह बँकेला दिले आहे.
‘केवायसी’चे पालन न होता अनेक व्यवहार संशयास्पद असल्याचे रिझव्‍‌र्ह बँकेला यापूर्वी आढळून आले आहे. याबाबत उपरोक्त दोन बँकांसह खासगी तसेच सार्वजनिक क्षेत्रातील काही बँकांना याबाबत रिझव्‍‌र्ह बँकेने सूचित केले होते. त्यानंतर या दोन बँकांबाबत आता दंड कारवाई करण्यात आली आहे.