‘भारत देयक भरणा प्रणाली’तून नवीन ग्राहकोपयोगी सुविधा

वीज, पाणी, दूरध्वनी आदी ग्राहक सेवांची देयक भरण्यासाठी सेवा देऊ इच्छिणाऱ्यांना अर्ज करण्यास रिझव्‍‌र्ह बँकेने सांगितले आहे. यासाठीच्या भारत देयक भरणा पद्धतीत सहभाग नोंदविण्यासाठी येत्या महिन्याभरात विनंती पत्र सादर करण्याचे आवाहन केले गेले आहे. याबाबतची मार्गदर्शक तत्त्वे नोव्हेंबर २०१४ मध्येच सादर करण्यात आली होती.

वीज, पाणी, दूरध्वनी, गॅस तसेच दूरध्वनी, डीटीएच आदींसाठीच्या निश्चित कालावधीतील देयकाचा भरणा करून देणारी सेवा पुरविणाऱ्यांकरिता हे अर्ज ग्राह्य़ आहेत. भारत देयक भरणा पद्धती चलित घटक म्हणून भारत देयक भरणा पद्धतीत (भारत बिल पेमेंट्स सिस्टम्स-बीबीपीएस) पात्र अर्जदारांना देयक भरणा सेवा देता येईल. तंत्रज्ञानाद्वारे वेतन अदा पद्धतीतील आघाडीच्या ‘नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ (एनपीसीआय) चेच ‘बीबीपीएस’ हे एक अंग असेल, असे रिझव्‍‌र्ह बँकेने मंगळवारी स्पष्ट केले. दैनिक अथवा मासिक तत्त्वावर संघटित देयक भरणा करणाऱ्या विद्यमान यंत्रणांनाही २० नोव्हेंबपर्यंत अर्ज करता येतील. त्यासाठी संबंधित कंपनीच्या संचालक मंडळाची मान्यता असलेले व रिझव्‍‌र्ह बँकेच्या ‘पेमेंट व सेटलमेंट सिस्टम्स’ विभागाची परवानगी असलेले पत्र अर्जदारांकरिता जोडावे लागेल.