देशाचा आर्थिक विकासदर आपल्या आधीच्या अंदाजापेक्षा कमी रेखाटतानाच महागाईचा दरही आता शिथील होऊ लागेल, या आर्थिक आणि पतविकास अहवालात व्यक्त केलेल्या आश्वासकतेने रिझव्‍‌र्ह बँक मंगळवारच्या आपल्या तिमाही पतधोरणात व्याजदर कपात करेल, या आशेला बळकटी मिळत आहे. तमाम अर्थतज्ज्ञांकडून मध्यवर्ती बँकेमार्फत निदान रेपो दरात यंदा किमान पाव टक्के कपातीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
रेपो दर कमी झाल्यास ते गेल्या नऊ महिन्यात पहिल्यांदाच होतील. तत्पूर्वी सलग १३ वेळा मध्यवर्ती बँकेने व्याजदर वाढ केली आहे. तर रोख राखीव प्रमाण (सीआरआर) सध्या १९७५ नंतरच्या नीचांक पातळीवर आहे. यापूर्वीच्या १८ डिसेंबर २०१२च्या पतधोरण आढाव्यात रेपो दर तसेच सीआरआर स्थिर ठेवण्यात आला होता. हे दर अनुक्रमे ८ आणि ४.२५ टक्के आहेत.
सोमवारी सायंकाळी उशिरा जारी केलेल्या आर्थिक आणि पतविकास अहवालात रिझव्‍‌र्ह बँकेने चालू आर्थिक वर्षअखेर विकासाचा दर ५.५ टक्के असेल, असे म्हटले आहे. यापूर्वी ५.८ टक्के हा दर अपेक्षिणाऱ्या मध्यवर्ती बँकेने २०१३-१४ या आर्थिक वर्षांसाठीही तो ६.५ टक्के होईल, असा आशावाद व्यक्त केला आहे.
तर २०१२-१३ मध्ये महागाई दर ७.५ टक्के राहून आगामी आर्थिक वर्षांच्या सुरुवातीस तो ७ टक्क्यांपर्यंत विसावेल, असा विश्वासही रिझव्‍‌र्ह बँकेने अहवालात व्यक्त केला आहे. देशासमोर वाढत्या महागाईची चिंता कायम असली तरी पुढील वर्षांपासून हा दर कमी होईल, असे अहवालाने नमूद केले आहे. याचबरोबर वाढत्या चालू खात्यातील तसेच वित्तीय तुटीबाबतही चिंता व्यक्त करण्यात आली आहे. दुहेरी तुटीतील ही दरी आखणी विस्तारण्याची भीती वर्तविण्यात आली आहे.
रिझव्‍‌र्ह बँकेचे तिमाही पतधोरण ज्या प्रमुख महागाई दराचा आधार घेते तो डिसेंबरमधील दर ४.२४% या ३३ महिन्याच्या खालच्या पातळीवर सध्या आहे. तर गेल्या नोव्हेंबरमध्ये नोंदविला गेलेला अवघा १.१७% औद्योगिक उत्पादन दर तमाम अर्थव्यवस्थेतून विकासाला चालना देण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेकडून व्याजदराच्या कपातीची अपेक्षा करत आहे.
रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर डी. सुब्बराव यांनी यापूर्वीच्या तिमाही पतधोरणात जानेवारी व्याजदर कपातीचे आश्वासक सूर व्यक्त केला होता. महागाई ताळ्यावर येताना दिसल्यास अर्थव्यवस्थेला चालना म्हणून हा पर्याय स्वीकारला जाईल, असे त्यांनी नमूद केले होते.
अर्थविकासासह देशाच्या एकूण प्रगतीचे चित्र २०१३-१४ पासून सकारात्मक असेल, असा विश्वासही रिझव्‍‌र्ह बँकेने केलेल्या अहवालात व्यक्त केला आहे. अर्थव्यवस्थेतील रोखीची चणचण नाहीशा होण्याच्या दृष्टीने खुल्या बाजारातून निधी उभारणीचा उल्लेखही मध्यवर्ती बँकेने केला आहे. या माध्यमातून चालू आर्थिक वर्षांत आतापर्यंत १.३ लाख कोटी रुपये उभारले गेले आहेत.

रिझव्‍‌र्ह बँकेपुढील द्वंद्व
देशाचा आर्थिक विकासदर ५.५ टक्क्यांखाली जाईल
महागाईचाही ७.५ टक्के चढा स्तर कायम राहणार