नागरी सहकारी बँकांचे अस्तित्व नाहीसे करण्याचा रिझव्‍‌र्ह बँकेचा कोणताही मानस नसून उलट त्यांचे स्थान भक्कम करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे प्रतिपादन डेप्युटी गव्हर्नर आर. गांधी यांनी नागपूर येथे केले.
दि महाराष्ट्र अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनच्या वतीने नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या एकदिवसीय परिषदेत त्यांनी नागरी सहकारी बँकांनी माहिती तंत्रज्ञानाची कास धरण्याचे आवाहनही केले.
सहकारी बँकांच्या खासगीकरणाची शिफारस गांधी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने केल्यानंतर सहकारी बँकांचे नेतृत्व करणाऱ्या फेडरेशनने विरोध दर्शविला होता. या विषयावर चर्चा करण्यासाठी आयोजित या परिषदेच्या व्यासपीठावर केंद्रीय जहाज बांधणी व बंदरमंत्री नितीन गडकरी हेही उपस्थित होते.
नागरी बँकांसाठी सुचविण्यात आलेल्या रिझव्‍‌र्ह बँकेच्या शिफारशींवर सहकार क्षेत्रातील सर्वाच्या सूचना लक्षात घेऊन, सखोल चर्चेनंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल, असे गांधी म्हणाले.
सहकार क्षेत्रातील वाढती स्पर्धा लक्षात घेऊन नागरी सहकारी बँकांनी अद्ययावत माहिती तंत्रज्ञानाचा अधिकाधिक उपयोग करावा, तसेच खास तरुण वर्गाला या क्षेत्राकडे आकर्षित करावे, असा सल्लाही गांधी यांनी या वेळी दिला.
फेडरेशनचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ, सहकार आयुक्त दळवी, सहकार भारतीचे अध्यक्ष सतीश मराठे, आंध्र फेडरेशनचे अध्यक्ष जी. राममूर्ती, गुजरात फेडरेशनचे अध्यक्ष ज्योतींद्र मेहता, भारतीय बँक महासंघाचे (आयबीए) मोहन टांकसाळे, महाराष्ट्र फेडरेशनचे संचालक सी. बा. अडसूळ, सतीश गुप्ता, फेडरेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सायली भोईर, उपाध्यक्ष अजय ब्रrोचा आदींनीही या एकदिवसीय परिषदेला हजेरी लावली.