डिसेंबरच्या पतधोरण आढाव्यात रिझव्‍‌र्ह बँकेकडून रेपो दरात कोणतेही बदल केले जातील, असे अपेक्षित नाही. व्याजाचे दर कमी होतील, अशी पावले रिझव्‍‌र्ह बँकेकडून जरूर टाकली जातील, पण त्यासाठी आगामी वर्षांच्या सुरुवातीपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल, असे मत स्टेट बँकेच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांनी व्यक्त केले. त्या म्हणाल्या ‘‘सर्वागाने विचार करता नजीकच्या काळात महागाई दरात आणखी घट झालेलीच दिसून येईल. तथापि गेल्या वर्षांतील नोव्हेंबर ते जानेवारीदरम्यानचा तुलनेत हा घसरलेला दरही प्रत्यक्षात वाढलेलाच दिसून येईल. मात्र रिझव्‍‌र्ह बँकेने निर्देशित केलेले महागाई दराचे निसरडय़ा वाटेवरील मार्गक्रमण हे मार्चमध्येच खऱ्या अर्थाने तालावर आलेले दिसेल.’’ भट्टाचार्य यांनी या शब्दात प्रतिक्रिया देत, रेपो दर कपातीबाबत तूर्तास अपेक्षा नसल्याचे सांगितले.