आज अर्धा टक्का दर कपातीची आशा; कमी महागाईमुळे मनोबल उंचावले

रिझव्‍‌र्ह बँकेकडून बुधवारच्या संभाव्य व्याजदर कपातीची आशा आता अधिक प्रमाणात उंचावली जात आहे. मध्यवर्ती बँकेने कमाल अध्र्या टक्क्य़ापर्यंत व्याजदर कपात केली तर आश्चर्य वाटायला नको, असे मत मंगळवारी व्यक्त करण्यात आले.

रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. ऊर्जित पटेल हे द्वैमासिक पतधोरण बुधवारी जाहीर करत आहे. तत्पूर्वी ते अध्यक्ष असलेल्या पतधोरण समितीची दोन दिवसांची बैठक मंगळवारी मध्यवर्ती बँकेच्या मुख्यालयी सुरू झाली. बैठक बुधवारीही सुरू राहणार असून दुपारनंतर गव्‍‌र्हनर पतधोरण बैठकीतील निर्णय जाहीर करणार आहेत. पटेल यांनी गव्हर्नर म्हणून त्यांच्या पहिल्या पतधोरणात पाव टक्का रेपो दर कपात केली होती. केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या पतधोरण समितीचीही ही दुसरी बैठक आहे. समितीत आता केंद्र सरकारचे सदस्यही सहभागी आहेत. यात बहुमताने निर्णय अपेक्षित आहे. यापूर्वी दर निर्णयाचे सर्वाधिकार गव्हर्नरला असायचे.

महागाई कमी झाली असल्याने यंदा व्याजदर कपात अपेक्षित असल्याचे एचडीएफसी बँकेच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. तर बँक ऑफ अमेरिका मेरिल लिंचने एप्रिल २०१७ पर्यंत आणखी दरकपात होऊ शकते. असे म्हटले आहे. बंधन बँकेने अध्र्या टक्क्य़ांपर्यंत दरकपातही होण्यास वाव असल्याचे नमूद केले आहे. विकासाला चालना देण्यासाठीही दरकपातीची अपेक्षा केली जात आहे. निश्चलनीकरणाचा विपरित परिणाम सहन करण्याकरिता यंदा अधिक प्रमाणात व्याजदर कपात व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.