गव्हर्नर पटेल यांचे कर्मचाऱ्यांना आवाहन

गेल्या आठवडय़ात रिझव्‍‌र्ह बँकेच्या कर्मचारी संघटनेने मध्यवर्ती बँकेच्या कारभारात सरकारच्या वाढत्या हस्तक्षेपातून तिच्या स्वायत्तेबाबत जाहीरपणे चिंता व्यक्त केली. तर त्याला प्रतिसाद म्हणून गव्हर्नर ऊर्जित पटेल यांनी कर्मचाऱ्यांनाच आपल्या संस्थेच्या प्रतिष्ठा आणि नि:स्पृहतेचे त्वेषाने रक्षण करावे, असे ई-मेल संदेशाद्वारे आवाहन केले आहे.

गव्हर्नरपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर रिझव्‍‌र्ह बँकेच्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधणाऱ्या आपल्या पहिल्यावहिल्या ई-मेल संदेशात पटेल यांनी, ‘आपल्या संस्थेच्या प्रतिष्ठा व सचोटीला बाधा आणणाऱ्या कोणत्याही कृतीला सहन केले जाणार नाही. आपणच ती संपूर्ण समर्पण व जोशाने जपायला हवी,’ असा आर्जव वजा इशारा दिला आहे.

‘मला खात्री आहे की एकजुटीने काम करीत काळाची हाक आणि आव्हानाला जागून या महनीय संस्थेच्या प्रतिमेची आपण जपणूक करू शकू’, असे पटेल यांनी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून अवैध ठरविण्याच्या सरकारच्या निर्णयाच्या अंमलबजावणीचा अप्रत्यक्ष संदर्भ देत पत्रात विधान केले आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेच्या स्थिरतेच्या दृष्टीने रिझव्‍‌र्ह बँकेचा धोरणात्मक पुढाकार सर्वश्रेष्ठ राहिला असून, त्याचे सकारात्मक परिणामही दिसून येत आहेत. तरी हे निरंतर सुरू असलेले कार्य असून, बदलत्या आव्हानात्मक वातावरणाशी सुसंगत आवश्यक फेरबदल करीत राहावेच लागेल, अशी पुस्तीही त्यांनी जोडली आहे.

निश्चलनीकरण निर्णयाच्या अंमलबजावणीचे आव्हान पेलण्यास रिझव्‍‌र्ह बँक समर्थ असताना केंद्रीय अर्थमंत्रालयाकडून त्यात ढवळाढवळ व्यथित करणारी असल्याचे रिझव्‍‌र्ह बँकेच्या कर्मचारी संघटनांनी एकत्र येऊन गव्हर्नर पटेल यांना गत आठवडय़ात पत्र लिहिले. त्यातच रिझव्‍‌र्ह बँकेच्या दोन माजी गव्हर्नर बिमल जालान आणि वाय. व्ही. रेड्डी यांनी मध्यवर्ती बँकेच्या स्वायत्तेतबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करणारे मत व्यक्त केले. बुधवारी काँग्रेस पक्षाने चलनकल्लोळावर रोष म्हणून देशभरात रिझव्‍‌र्ह बँकेच्या कार्यालयाबाहेर उग्र स्वरूपाची निर्दशने केली आहेत.