राष्ट्रीय केमिकल्स अॅण्ड फर्टिलायझर्स लि. (आरसीएफ)ने विदेशात व्यवसाय विस्ताराची संधी म्हणून इराणमध्ये गुजरात नर्मदा व्हॅली फर्टिलायझर्स अॅण्ड केमिकल्स लि. (जीएनएफसी) या सार्वजनिक क्षेत्रातील अन्य कंपनीच्या सहयोगाने इराणमध्ये खत प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला असल्याचे स्पष्ट केले. या प्रस्तावित प्रकल्पासाठी इराणमधील कंपनीला भागीदार करणेही क्रमप्राप्त असून, या भागीदाराच्या निश्चितीचे काम एसबीआय कॅपिटल मार्केट्सवर सोपविण्यात आले आहे.
जगातील दुसऱ्या क्रमांकाचा वायू साठा असलेले इराण हे युरियाच्या निर्मितीसाठी आदर्श ठिकाण असून, तेथे १२.७ कोटी टन क्षमतेच्या युरिया उत्पादन प्रकल्पाचे नियोजन असल्याचे आरसीएफचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आर. जी. राजन यांनी सांगितले. कंपनीच्या भागधारकांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना, या प्रकल्पासाठी ८० कोटी अमेरिकी डॉलरचा खर्च अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. इराणमधील स्वस्त वायू पुरवठय़ाच्या आधाराने तयार होणारे हे खत भारतात विक्री आणले जाईल. इराणवर सध्या लादण्यात आलेले आंतरराष्ट्रीय र्निबध शिथिल झाल्यावर या प्रकल्पाची वाट सुकर होईल, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
पत्रकारांशी बोलताना राजन यांनी आरसीएफच्या भांडवली गुंतवणुकीच्या नियोजनाचीही माहिती दिली. विद्यमान आर्थिक वर्षांत ३०० कोटी रुपयांच्या तर पुढील वर्षांत १००० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे नियोजन असल्याचे ते म्हणाले.
देशात युरियाच्या मागणी-पुरवठय़ातील वाढती दरी पाहता, आरसीएफने थळ येथील युरिया उत्पादनक्षमतेत विस्ताराचे धोरण अनुसरले आहे. थळ-३ या अंदाजे ४,५०० कोटी खर्चाच्या विस्तार प्रकल्पाचे तिचे नियोजन असून, त्यातून ३,८५० टन प्रति दिन युरिया उत्पादन आणि २,२०० टन प्रति दिन अमोनिया उत्पादन अपेक्षित आहे.