यंदा चांगला झालेला पाऊस हे फायद्याचे ठरणार असले तरी रुपयाच्या तीव्र स्वरूपाच्या घसरणीने आयातीत मालावर तिमाहीत प्रचंड नुकसान सोसाव्या लागलेल्या ‘राष्ट्रीय केमिकल अ‍ॅण्ड फर्टिलायजर्स लि. (आरसीएफ)’ या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीने आपल्या युरिया उत्पादन क्षमतेत लक्षणीय वाढीचे नियोजन आखले आहे. यातून तालचेर, ओरिसा येथे प्रतिदिन ३८५० मे. टन युरिया निर्मिती असलेल्या संयुक्त भागीदारीतील रासायनिक खत संकुलात रु. १००० कोटींच्या भांडवली सहभागाची तिची योजना आहे.
तालचेर येथील दोन भागीदारी प्रकल्पांमध्ये सहभागासाठी १००० कोटी रुपये गुंतविले जाणार आहेत, असे आरसीएफचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आर. जी. राजन यांनी कंपनीच्या ३५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. कोल इंडिया, गेल आणि फर्टिलायझर कॉर्पोरेशन इंडिया या सरकारी कंपन्यांसह आरसीएफची या प्रस्तावित खत संकुलात संयुक्त भागीदारी असेल. युरियासह प्रतिदिन २७०० मे. टन अमोनिया, ८५० टन नायट्रिक अ‍ॅसिड आणि १००० मे. टन अमोनियम नायट्रेटचे उत्पादन घेतले जाणार आहे.
नेहमीच्या कच्चा मालाच्या तुलनेत वेगळा कच्चा माल (कोल गॅसिफिकेशन) वापरून होणारी युरियानिर्मिती भारताच्या पूर्वेकडील भागाची गरज भागविण्यास मदतकारक ठरेल, असा विश्वास राजन यांनी व्यक्त केला. विविध प्रवतर्कानी अलीकडेच या संयुक्त प्रकल्पासंबंधाने सामजंस्य करार केला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.