‘बिग बिलियन डे’च्या घोषणाबाजीत दोनच दिवसांपूर्वी इ-कॉमर्स व्यासपीठावरील गोंधळ ताजा असतानाच मुंबईतील स्थावर मालमत्ता क्षेत्रातही एक अब्ज रुपयांचे व्यवहार पार पडले आहेत. दसऱ्याचे निमित्त साधत सलग आलेल्या सुटय़ांचा लाभ घेण्याच्या दृष्टीने मुंबईत आयोजिण्यात आलेल्या गृह निर्माण प्रदर्शनाच्या चार दिवसांदरम्यान १६० कोटी रुपयांचे व्यवहार झाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा घरांच्या किमती ३० टक्क्यांनी वाढल्या असतानाही यावेळी झालेल्या व्यवहाराने एकूणच मालमत्ता व्यवसायावरील मंदीचे मळभ दूर झाल्याचे चित्र आहे.
वांद्रे कुर्ला संकुलात २ ते ५ ऑक्टोबर दरम्यान भरलेल्या महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्री(एमसीएचआय)च्या गृहप्रदर्शनास ८७,७३४ उत्सुक घरखरेदीदारांनी भेट दिली. लागून आलेल्या सुटीचा लाभ यावेळी प्रदर्शन आयोजकांनाच्या पथ्यावरच पडला. १५० हून अधिक विकासक कंपन्या सहभागी झालेल्या या प्रदर्शनात जवळपास ४०० मालमत्तांची विक्री झाल्याचे कळते. यामुळे प्रत्यक्ष घर खरेदी-विक्रीचे झालेले व्यवहार हे १.६ अब्ज रुपयांचे झाल्याचे समजते. येथे असलेल्या विकासकांनी त्यांच्या प्रकल्पांच्या किमती गेल्या वेळेपेक्षा २५ ते ३० टक्क्यांपर्यंत वाढविल्या होत्या.
‘एमसीएचआय-क्रेडाई’द्वारे आयोजित करण्यात आलेल्या यंदाच्या प्रदर्शनाला प्रति दिन सरासरी विक्रमी २० हजार घर खरेदीदारांनी भेट दिली. हा प्रतिसाद पाहून आयोजकांनी यंदा प्रत्यक्ष प्रदर्शनानंतरही संकेतस्थळाच्या (व्हच्र्युअल एक्स्पो) माध्यमातूनही चालू महिनाअखेपर्यंत हे प्रदर्शन सुरू ठेवण्याचे निश्चित केले आहे. गृह खरेदी – विक्रीचा मोसम पंधरवडय़ावर येऊन ठेपलेल्या दिवाळीपर्यंत हे प्रदर्शन ऑनलाइन स्वरूपात कायम असेल, असे प्रदर्शनात सहभागी झालेल्या एका विकासकाने सांगितले. विकासकांनीदेखील यंदा खरेदीदारांसमोर मोठय़ा संख्येतील प्रकल्पांचा पर्याय उपलब्ध करून दिला होता.
मुंबईत दरसाल भरणाऱ्या या प्रदर्शनाचे यंदाचे हे २३वे वर्ष होते. प्रदर्शनाला भेट देणाऱ्यांची संख्या आणि विकली गेलेली घरे या दोन्हींबाबत नवीन विक्रम स्थापित करण्यात आला असल्याचे एमसीएचआय-क्रेडाई प्रदर्शन समितीचे अध्यक्ष बंदिश अजमेरा यांनी सांगितले. गृहनिर्माण बाजारपेठ पुन्हा गतिशील होत असल्याचा हा निश्चितच संकेत असल्याचे ते म्हणाले. यंदाच्या वर्षी प्रदर्शनात जवळपास १५० विकसकांनी १५०० हून अधिक प्रकल्प मांडले होते. विकसकांचा सहभागही गेल्या वर्षांतील प्रदर्शनाच्या तुलनेत दुपटीने वाढला आहे. गृहवित्त संस्था आणि बँकांकडून प्रदर्शनातील सहभाग वाढला होता, असे अजमेरा यांनी सांगितले.