नवोद्योगांच्या प्रारंभिक भरण-पोषणास साहाय्य करणाऱ्या ‘रेड रिबन’चे प्रतिपादन

सरकारी धोरणाची अनुकूलता व वातावरणनिर्मिती, निधीची उपलब्धता, दृढीकरण उपक्रम, नवनवीन विकसित होत असलेले तंत्रज्ञान आणि भरभराटीची स्थानिक बाजरपेठ आदी घटकांमुळे भारतात नवोद्यमी अर्थात स्टार्टअप उद्योजकांचा उमदा नवप्रवाह पुढे येताना दिसत आहे. परंतु स्टार्टअप म्हणजे आधुनिक माहिती-तंत्रज्ञानाचा बहुपयोगी कल्पक वापर केवळ नसून, त्या पलीकडे विना-तंत्रज्ञान क्षेत्रात नव्या कल्पना घेऊन आलेल्या स्टार्टअप प्रकल्पांचीही जोमदार प्रवाह असल्याचे, याच प्रकारच्या प्रकल्पांच्या विकसनाला विविधांगी मदत करणाऱ्या ‘रेड रिबन’ या सल्लागार संस्थेचे म्हणणे आहे. ब्रिटनस्थित रेड रिबन ही गुंतवणूक सल्लागार कंपनी असून, सर्वात विकसित अर्थव्यवस्थांमधील सर्वोत्तम तंत्र व तंत्रज्ञानांना भारतासारख्या उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये स्थान मिळवून देणे या उद्देशाने तिची स्थापना झाली आहे. रेड रिबन अ‍ॅडव्हर्जरी सव्‍‌र्हिसेसचे संस्थापक आणि सीईओ सुचित पुनोसे यांनी सांगितल्याप्रमाणे, या निकषांशी अनुरूप कठोर चाचणीतून निवडलेल्या प्रकल्पांमध्ये स्वत:चे बीज भांडवल गुंतवून, उद्योग उभारताना भेडसावणाऱ्या प्रारंभिक आव्हानांचा भारही खांद्यावर घेऊन भारतात कंपनीने सुरुवात केली आहे.

कुठल्या प्रकारच्या प्रकल्पात सध्या गुंतवणूक केली आहे?
सध्या भारतात तीन व्यवसायांचे भरणपोषण कंपनी करत आहोत. पहिलं बजेट हॉटेल शृंखला (इको हॉटेल), दुसरी प्री-फॅब्रिकेटेड संकल्पनेवर आधारलेली बांधकाम कंपनी (मोडय़ुलेक्स) आणि तिसरं सौर ऊर्जेशी संबंधित (आर्मेक) कंपनी आहे. पुढील दहा वर्षांमध्ये १०,००० खोल्या निर्माण करण्याची योजना असलेली संघटित बजेट हॉटेल शृंखला, इको हॉटेल हा जगातील पहिला कार्बन नियंत्रित करणारा ब्रॅण्ड असेल. अल्पावधीत मजबूत इमारती उभारणारी क्राँकीटऐवजी स्टीलचा वापर करणारी मॉडय़ुलेक्स ही देशातील पहिली संपूर्ण स्टील मॉडय़ुलर बांधकाम कंपनी असेल. आर्मेक एनर्जी ही विकेंद्रित स्वरूपात पवन आणि छतावरील सौरऊर्जेसारख्या अक्षय्य पर्यायांकडे लोकांना आकर्षित करेल.

भारतात कोणत्या आव्हानांना तोंड द्यावं लागलं?
प्रत्येक टप्प्यावर नियामक परवानग्या मिळवणे हे नवउद्यमींसाठी सगळ्यात मोठे आव्हान आहे. तसेच, एकूणच बाजारपेठेतील प्रतिक्रिया त्वरेने आजमावणे तितकेसे सोपे नाही. तथापि सुधारित कर फायदे हे गुंतवणूकदारांना या क्षेत्रांतर्गत प्रोत्साहन देणारे ठरतील असा विश्वास वाटतो.

स्टार्टअपना भांडवली साहाय्यात भूमिका काय ?
वर म्हटल्याप्रमाणे, विना-तंत्रज्ञानाधारित पारंपरिक धाटणीच्या ‘ब्रीक अ‍ॅण्ड मॉर्टर’ संकल्पनेवर बेतलेले सर्वोत्तम व्यवसाय प्रकार आम्ही निवडले आणि या व्यवसायाचे घडणीसाठी प्रारंभिक गुंतवणूकदारांशी आम्ही त्यांची गाठ घालून दिली. पुढे त्यांचा व्यवसाय ढाचा पुढे सुरू राहण्यासाठी जरूर तितका निधी मिळवण्यासाठी मदत केली.

भविष्यकालीन योजना काय?
भारतात सर्वदूर ठसा उमटवण्यासाठी फ्रँचाइजी इंडियामार्फत विस्तारित वितरण व्यवस्था स्थापण्याची योजना आहे. भारतात आपल्या दृश्यमानतेला गती देण्यासाठी व्यावसायिक धोरणाची अंमलबजावणी वेगाने करण्याचा दृष्टिकोन आहे.