भारतात जागतिक गुंतवणूकदारांसाठी उद्योगानुकूल वातावरण निर्माण केले जाईल व त्यासाठी जमीन, कामगार व कर या तीन क्षेत्रात सुधारणांची गरज आहे, तरच गुंतवणूकदार आकर्षित होतील याची आपल्याला जाणीव आहे, असे प्रतिपादन अमेरिका दौऱ्यावर असलेले अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केले.
सरकार या तीनही क्षेत्रातील आर्थिक सुधारणांना वचनबद्ध असल्याचे सांगून ते म्हणाले, की परदेशी गुंतवणूकदारांच्या समस्यांवर कायमस्वरूपी सल्लामसलत केंद्र स्थापन करण्यात येईल. सरकारने कर सुधारणांना सुरुवात केली आहे, करधोरणातील आक्रमकता कमी करून ती अधिकाधिक अनुकूल व किमान प्रतिकूल असेल, असा प्रयत्न आहे. करनिर्धारणाच्या बाबतीत भारतात सकारात्मक निर्णय घेतले जात आहेत. कंपनी कर स्पर्धात्मक केले आहेत. वस्तू व सेवा कर (जीएसटी) तसेच इतर मार्गानी सुलभता आणली जात आहे.
जगातील गुंतवणूकदारांना भारतात उद्योग करण्यासाठी अनुकूल वातावरण बनवले जाईल.  गुंतवणूकदारांना अनिश्चितता नको आहे. जगात आर्थिक वातावरण फारसे उत्साहजनक नसतानाही भारताची आर्थिक वाढीची क्षमता जास्त आहे व आर्थिक शिस्त काटेकोर आहे, अनेक क्षेत्रे गुंतवणुकीस खुली झाली असून पायाभूत सुविधात गुंतवणुकीस मोठा वाव आहे.
जगात मंदीसदृश वातावरण असताना भारतासारख्या देशात गुंतवणूक करण्याच्या संधीचा लाभ घ्यावा. त्यामुळे आर्थिक सुधारणा राबवणे चालू ठेवले, तर उद्योग करण्यास अनुकूल वातावरण निर्माण होऊन जगातील गुंतवणूकदारांना ही संधी प्राप्त होईल. परदेशी गुंतवणूकदारांना सल्लामसलतीसाठी कायमस्वरूपी यंत्रणा असावी अशी सूचना सिलिकॉन व्हॅलीतील उद्योजकांनी केली होती ती जेटली यांनी मान्य केली आहे.
जमीन हा आवश्यक घटक आहे. भूमि अधिग्रहण विधेयक मंजूर झाले नसले, तरी चांगली किंमत दिली तर उद्योजक       शेतक ऱ्यांकडून जमीन खरेदी करू शकतील. विधेयक मंजूर झाले तर औद्योगिक पट्टे व ग्रामीण पायाभूत सुविधा निर्माण करता येतील, असे सांगून ते म्हणाले, की आपला अमेरिका दौरा यशस्वी झाला असून अनेक गटातील लोकांशी आपण चर्चा केल्या. ओबामा प्रशासनातील अधिकारी व मंत्र्यांना भेटलो, उद्योजकांशी व विचारवंतांशी चर्चा केली.