हवालाच्या माध्यमातून दररोज मोठ्या रकमेचा व्यवहार केल्याचा धक्कादायक खुलासा आदित्य बिर्ला मॅनेजमेंट कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या वरिष्ठ वित्तीय अधिकाऱय़ाने प्राप्तिकर खात्याला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात केला आहे. आदित्य बिर्ला समूहातील हिंदाल्को कंपनी कोळसा खाण वाटप घोटाळ्यावरून आधीच वादाच्या भोवऱयात सापडली आहे. त्यात आता याच समूहातील आदित्य बिर्ला मॅनेजमेंट कंपनीने हवालाच्या माध्यमातून व्यवहार केल्याचे आणि त्यासाठी अनोळखी व्यक्तींकडे रोकड दिल्याचे कबुल केल्यामुळे हा समूह आणखी अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.
कंपनीच्या लेखा विभागाचे उपमहाव्यवस्थापक आनंदकुमार सक्सेना यांनी या व्यवहारांबद्दल लेखी स्वरुपात माहिती दिली आहे. त्याचबरोबर या स्वरुपाने किती रुपयांचा व्यवहार केला, याची माहिती आता उपलब्ध नाही. ज्या काळात हे व्यवहार करण्यात आले, त्या काळातील सर्व माहिती नष्ट करण्यात आली असल्याची कबुलीही सक्सेना यांनी दिली.
केंद्रीय अन्वेषण विभागाने १५ ऑक्टोबर २०१३ रोजी या कंपनीच्या कार्यालयावर छापा टाकला होता. त्यावेळी तेथील तिजोरीमध्ये २५.१३ कोटी रुपयांची रोकड मिळाली होती. या तिजोरीच्या चाव्या आपल्याकडेच होत्या, असे सक्सेना यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर ही रोकड कुठून आली, हे सांगू शकत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. हिंदाल्को खाण वाटप घोटाळ्याचा तपास करतानाच सीबीआयने हा छापा टाकला होता. समूहाचे कार्यकारी अध्यक्ष शुबेंदू अमिताभ यांच्या सांगण्यावरून रोकड देण्या-घेण्याचे सर्व व्यवहार करण्यात आले होते, असेही सक्सेना यांनी सांगितले.