भारताच्या तेल व वायू क्षेत्राकरिता ४०,००० कोटींची गुंतवणूक

रिलायन्स इंडस्ट्रिजबरोबरची देशातील तेल व वायू क्षेत्रातील भागीदारी विस्तारताना ब्रिटिश कंपनी बीपीने ४०,००० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा मानस गुरुवारी व्यक्त केला. हिंद महासागरातील कृष्णा गोदावरी खोऱ्यातील डी६ पट्टय़ातील नव्या वायू क्षेत्राकरिता पुढील आठ वर्षांसाठी ही गुंतवणूक असेल. त्याचबरोबर दोन्ही कंपन्या देशात पेट्रोल पंप उभारणीसाठीही सामंजस्य करणार आहेत.

बीपी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी बॉब डुडले व रिलायन्स इंडस्ट्रिजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी गुरुवारी नवी दिल्लीत केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) धर्मेद्र प्रधान यांची भेट घेतली. जवळपास दिड तास ही बैठक चालली. यानंतर उभय व्यावसायिक भागीदारांमार्फत व्यवसाय विस्ताराचे पुढील पाऊल स्पष्ट करण्यात आले.

भारताच्या तेल व वायू क्षेत्रातील बदलत्या सरकारी धोरणामुळे आम्हाला नवीन संसाधन विकसित करण्याची संधी मिळत असल्याचे कौतुगोद्गार बॉब यांनी यावेळी काढले. तर अंबानी यांनी यावेळी, बीपी कंपनीच्या सहकार्याने रिलायन्सला पेट्रोल पंप व्यवसायात अधिक विस्तार करता येईल, असा विश्वास व्यक्त केला. कृष्णा गोदावरी खोऱ्यातील (केजी) डी६ विहिर परिसरातील नव्याने विकसित करण्यात येणाऱ्या आर श्रेणीच्या तेल व वायू उत्खननाकरितादेखील बीपी कंपनीबरोबरची रिलायन्सची भागीदारी असेल. यामुळे भारताची इंधन आयातीवरील अवलंबित्व १० टक्क्य़ांनी कमी होईल.

रिलायन्स बीपीसह पेट्रोल पंप उभारणार

रिलायन्स इंडस्ट्रिज ही बीपी कंपनीबरोबरची भागीदारी पारंपरिक तसेच अपारंपरिक इंधन व्यवहारातही विस्तारली जाणार आहे. याकरिता उभय कंपन्या देशभरात पेट्रोल पंप सुरू करणार आहेत. इंधन विपणन व विक्री क्षेत्रात दोन्ही कंपन्या भविष्याते.त्रित वाटचाल करतील. रिलायन्सचे सध्या अनेक पेट्रोल पंप आहे. मात्र मधल्या काळात हा व्यवसाय ठप्प होता. आता बीपी कंपनीच्या सहकार्याने त्याला पुनरूज्जिवन मिळणार आहे. याद्वारे सध्याच्या पेट्रोल पंपांची संख्याही नजीकच्या कालावधीत विस्तारली जाईल. भारतात सध्या ५९,५९५ पेट्रोल पंप आहेत. पैकी सर्वाधिक पेट्रोल पंप हे सार्वजनिक क्षेत्रातील तेल व वायू विपणन व विक्री कंपन्यांमार्फत चालविले जातात.

untitled-14