४१३ कोटींची गुंतवणूक

आघाडीची चित्रपट व मालिका निर्माती कंपनी असलेल्या बालाजी टेलिफिल्म्समधील मोठा हिस्सा खरेदीचा निर्णय रिलायन्स इंडस्ट्रीजने घेतला आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने बालाजी टेलिफिल्म्समधील २४.९२ टक्के हिस्सा खरेदी करण्याच्या प्रस्तावाला गुरुवारी मंजुरी दिली.

प्राधान्य समभाग खरेदीच्या माध्यमातून झालेल्या या व्यवहाराची माहिती कंपनीने गुरुवारी भांडवली बाजाराला दिली. बालाजी टेलिफिल्म्सला याबाबत भागधारकांची परवानगी घ्यावी लागेल. बालाजी टेलिफिल्म्सचे अध्यक्ष व ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र कपूर यांनी रिलायन्सच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजने तिचे चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीचे वित्तीय निष्कर्ष जाहीर केले. याबाबत बोलाविण्यात आलेल्या कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत बालाजी टेलिफिल्म्सचे २.५२ कोटी समभाग खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रति समभाग १६४ रुपये दराने झालेला हा व्यवहार ४१३ कोटी रुपयांचा आहे.

दूरचित्रवाहिन्यांच्या माध्यमातून प्रसार व मनोरंजन माध्यमांमध्ये काही वर्षांपूर्वी शिरकाव केलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजने आता थेट मनोरंजन क्षेत्रातील निर्मिती कंपनीतील मोठा हिस्सा खरेदी करून या क्षेत्रातील विस्तार केला आहे. चित्रपट निर्मिती, एफएम रेडिओ आदींमध्ये सध्या रिलायन्सचे मुख्य प्रवर्तक मुकेश अंबानी यांचे धाकटे बंधू अनिल अंबानी हे कार्यरत आहेत.

तिमाही नफ्यात २८ टक्के वाढ

इंधन व्यवसायातून मिळणाऱ्या घसघशीत लाभाच्या जोरावर रिलायन्स इंडस्ट्रीजने एप्रिल ते जून या तिमाहीत नफ्यातील २८.३ टक्के वाढ नोंदविली आहे. कंपनीला तेल व वायू व्यवसायातून झालेला लाभ ३.५ टक्क्यांहून वाढला असून तो प्रति पिंप ११.९ डॉलर असा गेल्या नऊ वर्षांतील सर्वाधिक आहे. दरम्यान, समूहातील किरकोळ विक्री क्षेत्राने तिमाहीत ६५.८० टक्के नफावाढ नोंदविली आहे.

रिलायन्सच्या निकालाच्या प्रतीक्षेत, सेन्सेक्स, निफ्टीत सुस्त व्यवहार

मुंबई : भांडवली बाजाराने गुरुवारी सुस्तावलेल्या व्यवहारात काहीशा घसरणीने विश्राम घेतला. सायंकाळी जाहीर होणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या तिमाही वित्तीय निष्कर्षांची प्रतीक्षा करताना गुंतवणूकदारांनी आठवडय़ातील चौथ्या सत्रांत समभाग विक्रीचे धोरण अवलंबिले. परिणामी सेन्सेक्ससह निफ्टी त्यांच्या अनोख्या टप्प्यांपासून गुरुवारी आणखी दुरावले.

परिणामी ५०.९५ अंश घसरणीसह सेन्सेक्स ३१,९०४.४० वर बंद झाला. तर २६.३० अंश घसरणीसह निफ्टी ९,८७२.३०वर स्थिरावला. सेन्सेक्सने बुधवारी एकाच व्यवहारात तब्बल २४४.३६ अंश वाढ नोंदविली होती.

बुधवारच्या तेजीच्या जोरावर गुरुवारच्या सुरुवातीच्या सत्रात मुंबई निर्देशांकाने ३२ हजारांचा पल्ला पुन्हा एकदा गाठला होता. मात्र त्याची ही मजल सत्रअखेपर्यंत टिकू शकली नाही. तर निफ्टीचा सत्रातील तळ ९,८६३.४५ असा राहिला.

सार्वजनिक तेल व वायू कंपन्यांना सुरुवातीपासून असलेली मागणी प्रमुख निर्देशांक घसरल्यानंतरही दिवसअखेर कायम राहिली. कंपन्यांच्या तिमाही वित्तीय निष्कर्षांबाबतची गुंतवणूकदारांमधील चिंता अधिक वाढली.

सेन्सेक्समधील टाटा स्टील, एनटीपीसी, इन्फोसिसचे मूल्य २.६४ टक्क्यांपर्यंत घसरले. मुंबई शेअर बाजारात पोलाद, माहिती तंत्रज्ञान, औषधनिर्माण क्षेत्रातील समभागांमध्ये लक्षणीय घसरण नोंदली गेली. मुंबई शेअर बाजारातील मिड व स्मॉल कॅप निर्देशांक संमिश्र राहिले.