जिओच्या शुल्करचनेची गुंतवणूकदारांनाही भुरळ..

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या समभागाने बुधवारच्या व्यवहारात तब्बल ११ टक्के झेप घेऊन नऊ वर्षांच्या उच्चांकी झेप घेतली. कंपनीचे दूरसंचार क्षेत्रातील अंग रिलायन्स जिओने एप्रिलपासून सशुल्क सेवा सुरू करीत असून, इंटरनेट जोडणीसाठी मंगळवारी जाहीर केल्या गेलेल्या आकर्षक शुल्करचनेचे भांडवली बाजारात सकारात्मक पडसाद उमटले. बुधवारच्या समभागाच्या या मुसंडीने कंपनीने बाजारमूल्य एका दिवसात  ३८,७६१ कोटी रुपयांनी वधारले.

रिलायन्सचा समभाग बुधवारी बाजारातील व्यवहार संपुष्टात आले तेव्हा १०.९७ टक्के वाढीसह १,२०७.६५ रुपयांवर स्थिरावला. १,२०० रुपयांपल्याडचा भाव या समभागाने २९ मे २००८ नंतर प्रथमच पाहिला आहे. शिवाय एका दिवसाच्या व्यवहारात समभागाने इतकी मोठी झेप घेण्याचाही हा गत आठ वर्षांतील पहिलाच प्रसंग आहे. १८ मे २००९ रोजी झालेल्या व्यवहारात हा समभाग २१ टक्क्य़ांनी उंचावला होता.

जिओ सेवेला देशभरातून मिळालेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल, रिलायन्स उद्योगसमूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी मंगळवारी जाहीर निवेदनाद्वारे कृतज्ञता व्यक्त केली. याच वेळी त्यांनी १ एप्रिलपासून जिओसाठी नवीन शुल्करचना जाहीर केली.  एप्रिलपासून व्हॉइस कॉल्स मोफत मात्र जिओच्या नव्या तसेच जुन्या ग्राहकाला डाटासाठी पैसे मोजावे लागतील, असे या निमित्ताने स्पष्ट झाले. जिओच्या ग्राहक संख्येने अवघ्या काही महिन्यांत (१७० दिवसांत) १० कोटींचा टप्पा ओलांडल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

जिओच्या या शुल्करचनेतून कंपनीकडील रोखीचा ओघ वाढेल, असा विश्लेषकांचा कयास आहे. त्याचप्रमाणे जिओच्या मोफत सेवा बंद झाल्याने स्पर्धक दूरसंचार कंपन्यांवरील ताणही हलका होणे अपेक्षित आहे, ही बाबदेखील गुंतवणूकदारांना सुखावणारी ठरली.  कंपनीने जिओ सेवा ५ सप्टेंबर २०१६ पासून सुरू केली आहे.