‘रिलायन्स जिओ’च्या मोफत सेवेची योजना संपुष्टात येण्यास अवघे काही दिवस शिल्लक असताना आता कंपनीने ग्राहकांसाठी खूशखबर दिली आहे. जिओने ग्राहकांना नवीन ऑफर दिली आहे. स्वस्त इंटरनेट डेटा मिळवण्यासाठी प्राईम मेंबरशिप ऑफर देऊ केली आहेच; शिवाय आता मोफत डेटाची योजना नव्याने आणली आहे.

जिओतर्फे प्राईम मेंबरशिपनंतर ‘एकावर एक मोफत’ या योजनेची घोषणा केली होती. या योजनेनुसार कंपनीने ३०३ रुपयांचा ‘प्लॅन’ खरेदी करणाऱ्या ग्राहकांना ५ जीबी ४ जी डेटा आणि ४९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये १० जीबीचा ४जी डेटा मोफत देण्यात आला होता. मात्र, या प्लॅनची मुदत फक्त एका महिन्याची होती. आता जिओने आपल्या ग्राहकांसाठी नवीन योजना आणली आहे. त्यानुसार ग्राहकांना एका वर्षासाठी मोफत इंटरनेट डेटा मिळेल. त्यात ३०३ रुपये आणि ४९९ रुपयांच्या रिचार्जवर ग्राहकांना एकाच वेळी १२ महिन्यांसाठी रिचार्ज करता येऊ शकते. १२ महिन्यांच्या रिचार्जसाठी अनुक्रमे ३६३६ रुपये आणि ५९८८ रुपये मोजावे लागणार आहेत.

३६३६ रुपयांच्या रिचार्जवर ग्राहकांना २८ जीबी प्रतिमहिना डेटासोबत ५ जीबी अधिकचा डेटा मिळणार आहे. एकूण ६० जीबीचा अतिरिक्त डेटा मोफत मिळणार आहे. तर ५९८८ रुपयांच्या रिचार्जवर १२० जीबी मोफत डेटा मिळणार आहे. म्हणजेच दर महिन्याला १० जीबी डेटा मोफत मिळणार आहे.

हेही नक्की वाचा!

दरम्यान, रिलायन्स जिओची मोफत सेवा बंद होणार आहे. पण आता हवा आहे ती ‘जिओ प्राईम’ची. आतापर्यंत फ्री असणाऱ्या रिलायन्स जिओच्या सर्व्हिसेस काही शुल्क भरून आणखी एक वर्ष वापरता येणार आहे. जिओ प्राईमसाठी ९९ रूपयाचं नोंदणी शुल्क ठेवण्यात आले आहे. जर तुमच्याकडे रिलायन्स जिओचं सिम कार्ड असेल आणि तुम्हाला ‘जिओ प्राईम’सेवा घ्यायची असेल तर….

१. तुमच्या फोनवर ‘माय जिओ’ अॅप सुरू करा. जर या अॅपचं जुनं व्हर्जन जर तुम्ही वापरत असाल तर ते आधी अपडेट करून घ्या.
२. यानंतर तुम्हाला तुमच्या फोनवर इन्स्टाॅल केलेली जिओ अॅप्स दिसतील. माय जिओ या लिस्टमध्ये सगळ्यात वर असेल. याच्या बाजूला असलेल्या ‘open’ बटणाला सिलेक्ट करा
३. यानंतर तुम्हाला ‘साईन इन’ करावं लागेल. यासाठी यूझर नेम आणि पासवर्ड लागेल. तुमचा जिओ नंबर हेच तुमचं यूझरनेम आहे, जर तुम्ही पासवर्ड याआधी सेट केला नसेल तर तुम्हाला या साईन इन च्या वेळी तो सेट करावा लागेल.
४. अॅपच्या होम स्क्रीनवर खाली डाव्या बाजूला असलेला Recharge आॅप्शन सिलेक्ट करा. जर तुम्ही दुसऱ्या कुठल्या स्क्रीनवर असाल तर स्क्रीनच्या वरच्या डाव्या बाजूला असणाऱ्या तीन आडव्या रेषांच्या चिन्हावर क्लिक करत ‘जिओ प्राईम’चा पर्याय निवडा.
५. Rs.99 या बटणावर क्लिक करत जिओ प्राईम अॅक्टिव्ह करा.
६. तुम्हाला पेमेंट कसं करायचं आहे याचा पर्याय निवडा. जिओ प्राईम अॅक्टिव्ह होईल.
जिओ प्राईम तुम्ही ३१ मार्चपर्यंत अॅक्टिवेट करू शकता. ज्या यूझर्सना जिओ प्राईम घ्यायचं नाहीये त्याच्या नंबर्सवर रिलायन्स जिओचे नेहमीचं टॅरिफ प्लॅन्स चालू होतील.