मोफत सेवेचा तिमाहीवर भार; इंधन, रिटेलची मात्र आगेकूच

दूरसंचार क्षेत्रातील पुर्नप्रवेशाद्वारे मोफत सेवा देणाऱ्या रिलायन्स समूहातील जिओला मोठय़ा आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागले आहे. ऑक्टोबर २०१६ ते मार्च २०१७ या दुसऱ्या अर्धवार्षिकात कंपनीला २२.५०  कोटी रुपयांचा तोटा झाला आहे.

गेल्या वर्षांच्या तुलनेत कंपनीच्या तोटय़ात या कालावधीत तब्बल तीनपटीने वाढ झाली. गेल्या वर्षी याच कालावधीत जिओला ७.५० कोटींचा तोटा झाला होता. जिओने सप्टेंबर २०१६ पासून प्रत्यक्ष दूरसंचार सेवा सुरू केली होती.

गेल्या आर्थिक वर्षांच्या उत्तरार्धात कंपनीला कंपनीला कोणतेही कार्यान्वयन उत्पन्न मिळाले नाही. तर इतर उत्पन्न २.२३ कोटी रुपयांवरून ५० लाख रूपयांपर्यंत खाली आले आहे. इतर उत्पन्नात ७७.८ टक्क्यांची घसरण नोंदली गेली आहे. जिओने सुरुवातीला मोफत सेवा दिली. ३१ मार्चनंतर मोफत सेवा बंद करून ग्राहकांना प्राइम सदस्यत्व देऊ केले. त्याअंतर्गत सवलतीच्या दरात सेवा दिली जात आहे. जिओचे १० कोटींहून अधिक ग्राहक आहे.

तेल शुद्धीकरणातून रिलायन्सची घसघशीत कमाई

मोठय़ा उद्योग समूहापैकी एक असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजला ३१ मार्चअखेर संपलेल्या चौथ्या तिमाहीत ८,०४६ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. तेल शुद्धीकरणातून मिळणाऱ्या लाभामध्ये वाढ झाल्याने मुकेश अंबानी प्रवर्तित रिलायन्सने यंदा घसघशीत कमाईची नोंद केली आहे.

बहुप्रतीक्षित रिलायन्सचे वित्तीय निष्कर्ष सोमवारी जाहीर झाले. भांडवली बाजारातही या निकालाचे स्वागत झाले. मार्च २०१७ अखेरच्या तिमाहीचे निकाल जाहीर करताना कंपनीने नफ्यातील किरकोळ वाढ राखली आहे. तर सलग सातव्या तिमाहीत वाढीची नोंद झाली आहे. कंपनीला इंधनातून कमाई झाली असली तरी मोफत दूरसंपर्क सेवा देणाऱ्या जिओच्या तोटय़ामध्ये तीन पटीने भर पडल्याने समूहासमोर आर्थिक आव्हाने आहेत. परिणामी, रिलायन्ससाठी सरते आर्थिक वर्ष संमिश्र ठरल्याची प्रतिक्रिया विश्लेषकांनी दिली आहे.

रिलायन्सची गुजरातमधील जामनगरमध्ये सर्वात मोठा तेल व वायू शुद्धीकरण प्रकल्प आहे. जानेवारी ते मार्च २०१७ या तिमाहीत कंपनीला खनिज तेल शुद्धीकरणातून प्रति पिंप ११.५ डॉलरचा लाभ मिळाला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला प्रति पिंप १०.८ डॉलरचा लाभ झाला होता. तर नफा आणि एकूण महसुलातदेखील भरीव वाढ झाली आहे. चौथ्या तिमाहीत कंपनीला ८,०४६ कोटी रुपयांचा नफा झाला आणि ७४,६०० कोटी  रुपयांचा महसूल मिळाला आहे.

तेल शुद्धीकरणात सलग नवव्या तिमाही लाभ

तेल शुद्धीकरणातील लाभामध्ये सलग नवव्या तिमाहीत वाढ झाली आहे. गेल्या वर्षांच्या तुलनेत नफ्यात १२.३ टक्क्य़ांची वाढ झाली. तर ७,१६७ कोटी रुपयांचा नफा झाला होता. वार्षिक आधारावर रिलायन्सला २९,९०१ कोटी रुपयांचा नफा झाला असून यात १८.८ टक्क्य़ांची वाढ नोंदली गेली आहे. उल्लेखनीय म्हणजे कंपनीचा हा आतापर्यंतचा सर्वाधिक नफा आहे.

रिटेलच्या महसुलात ६० टक्के वाढ

पेट्रोकेमिकल्सप्रमाणेच रिलायन्स रिटेलच्या महसुलात ६० टक्क्य़ांची वाढ झाली आहे. जागतिक बाजारातील प्रतिकूल वातावरणात केलेली कामगिरी कौतुकास्पद असल्याचे रिलायन्सचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी म्हटले.

मुंबई शेअर बाजाराचे भांडवल सर्वोच्च स्थानी

गेल्या पंधरवडय़ातील उत्तम कामगिरी करणाऱ्या मुंबई शेअर बाजाराने सोमवारी सर्वोच्च भांडवली मू्ल्य राखले. बाजारात सूचिबद्ध सर्व कंपन्यांचे मूल्य आठवडय़ाच्या पहिल्याच सत्रात १२४ लाख कोटी रुपयांवर गेले. मुंबई शेअर बाजारातील २९० कंपन्यांच्या संमभागांनी त्यांचे वर्षभरातील सर्वोच्च मूल्यस्थान सोमवारी पटकाविले. रिलायन्स, एचडीएफसी बँकसारख्या समभागांच्या कामगिरीमुळे मुंबई शेअर बाजाराला सर्वोच्च बाजार भांडवल साध्य करता आले.