रिलायन्स जिओने तीन महिन्यांपूर्वी सुरू केलेल्या ४ जी सेवेतील सर्व विद्यमान व नव्या ग्राहकांना ३१ मार्च २०१७ पर्यंत मोफत डेटा व अमर्यादित व्हॉइस कॉल्स सेवा देणारी योजना गुरूवारी जाहीर केली. ४ सप्टेंबर रोजी जाहीर केलेली योजना पूर्वनियोजित घोषणेप्रमाणे ३१ डिसेंबपर्यंत सुरू राहणार होती. तिचा कालावधी कंपनीने वाढविला असून ग्राहकांना चार महिन्यांपर्यंत मोफत सेवाचा लाभ घेता येणार आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी या विस्तार योजनेची घोषणा गुरुवारी केली. ‘जिओ न्यू इयर ऑफर’अंतर्गत ग्राहकांना मोफत डेटा, व्हॉइस तसेच व्हिडीओ व अ‍ॅप्लिकेशन सुविधा मिळणार आहे. नव्या योजनेद्वारे ग्राहकांना घरपोच सिम कार्ड पुरविण्याचेही आश्वासन देण्यात आले आहे.

अंबानी यांनी यानिमित्ताने ‘जिओ मनी र्मचट्स सोल्युशन्स’ हे मोबाइल पेमेंट अ‍ॅपही सादर केले. याद्वारे येत्या काही आठवडय़ांपासून ५ सप्टेंबरपासून सुरू झालेल्या या सेवेचे गेल्या ८३ दिवसांत ५ कोटींहून अधिक ग्राहक झाले आहेत. या माध्यमातून कंपनी सर्वात मोठी ब्रॉडबँड सेवा पुरवठादार बनली आहे. हा टप्पा पार करण्यासाठी स्पर्धक कंपन्यांना १२ हून अधिक वर्षे लागली. जिओचा ग्राहक मिळविण्याचा वेग हा फेसबुक, व्हॉट्सअप आदी समाजमाध्यमांच्या तुलनेत अधिक राहिला आहे.

नोटाबंदीला पाठिंबा

भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती, अब्जाधीश अंबानी यांनी नोटाबंदीकरिता पंतप्रधान मोदी यांना पाठिंबा व्यक्त केला आहे. ८ नोव्हेंबर रोजी जाहीर झालेल्या या निर्णयावर अंबानी यांनी गुरुवारी प्रथमच प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ‘हा धाडसी आणि ऐतिहासिक निर्णय पंतप्रधानांनी घेतल्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो.’