सरलेल्या तिमाहीत नफ्यात किरकोळ वाढ नोंदविणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रिजने इंधनातून मिळणाऱ्या लाभातील फरक (मार्जिन) मात्र विस्तारला आहे. अर्थ विश्लेषकांचा अंदाज बाजुला सारत कंपनीने ९.३ डॉलर प्रति पिंप फरक नोंदविला आहे. तिमाहीच्या तुलनेत ही झेप २२ टक्क्यांची आहे.
रिलायन्स कंपनी जानेवारी ते मार्च २०१४ दरम्यान तेल व वायूतून मिळणारा लाभ प्रति डॉलर ८.६ डॉलर प्रति पिंप मिळवेल, अशी अर्थतज्ज्ञांना अटकळ होती. गेल्या काही दिवसांपासून विविध निमित्ताने कंपनीने भारतीय खोऱ्यातील आपले इंधन उत्पादक प्रकल्प बंद ठेवल्यामुळे हा फरक कमी होण्याची शक्यता वर्तविली होती. कंपनीने आधीच्या तिमाहीतील ७.६ प्रति पिंप डॉलरच्या तुलनेत यंदा अधिक लाभ कमाविला आहे. मात्र वर्षभरापूर्वीच्या याच कालावधीच्या १०.१ डॉलर प्रति पिंपपेक्षा तो कमी आहे.
कंपनीने शुक्रवारी जारी केलेल्या तिमाही निष्कर्षांनुसार, कंपनीने निव्वळ नफ्यात अवघे ०.८ टक्के वाढ राखली आहे. जानेवारी ते मार्च दरम्यान कंपनीला ५,६३१ कोटी रुपये नफा झाला. विश्लेषकांच्या ५,६५५ कोटी रुपयांपेक्षा हा अंदाज किरकोळ कमी आहे. मात्र कंपनीने तिमाहीत कमाविलेला निव्वळ नफा हा गेल्या दोन वर्षांतील सर्वाधिक तिमाही नफा आहे. तर यंदा प्रति समभाग तो १७.४ रुपये अधिक आहे. कंपनीने वर्षभरापूर्वी कमी, ५,५८९ कोटी रुपयांचा नफा राखला होता. त्यावेळी प्रति समभाग नफाही १७.३ रुपये होता.
भारतीय चलनाच्या तुलनेत भक्कम होणाऱ्या अमेरिकन डॉलरचा चांगला लाभ कंपनीला मिळाला आहे. वर्षभरापूर्वी डॉलरच्या समोर रुपया ५४.२० असताना यंदाच्या तिमाही दरम्यान तो ६१.८० वर होता. विक्री यंदा तिमाही तुलनेत १३ टक्क्यांनी उंचावत ९७,८०७ कोटी रुपयांवर गेली आहे.
कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यंदाच्या निकालाबाबत समाधान व्यक्त केले आहे. तेल व वायू व्यवसायाने यंदाच्या निकालात लक्षणीय भर घातली आहे, असेही ते म्हणाले.
गेल्या आर्थिक वर्षांतील शेवटच्या तिमाहीत विक्री वर्षभरापूर्वीच्या तिमाहीच्या एक लाख कोटी रुपयांनी कमी होत यंदा ९७,८०७ कोटी रुपये झाली आहे. २०१३-१४ मधील कंपनीची उलाढाल ४,०१,३०२ कोटी रुपये झाली आहे. ती ८.१ टक्क्यांनी वाढली आहे.
कंपनीचा रिटेल व्यवसायही आता प्रगतीपथावर येऊ लागला असून या जोरावर कंपनी या क्षेत्रातही दालन आदी विस्तार करेल, असेही कंपनीने म्हटले आहे. या क्षेत्रात ्रंकंपनीचा महसूल ३४ टक्क्यांनी वाढला आहे.
कंपनीच्या तिमाही निकालाच्या पूर्वसंध्येला रिलायन्सचे समभाग मूल्य मुंबई शेअर बाजारात गुरुवारी १.८८ टक्क्यांनी वधारून ९५८.७५ रुपयांवर स्थिरावले होते. नफ्यातील वित्तीय निष्कर्षांच्या जोरावर व्यवहारात ते ९६२ रुपये अशा दिवसाच्या उच्चांकावरही पोहोचले होते.