जेपी समूहातील तीन जलविद्युत प्रकल्प अनिल धीरुभाई अंबानी समूहातील रिलायन्स पॉवरने आपल्या ताब्यात घेतले आहेत. जेपी समूहाची अबुधाबीस्थित कंपनीबरोबरची चर्चा फिस्कटल्यानंतर १,७९१ मेगाव्ॉटच्या या प्रकल्पांवर रिलायन्सचे वर्चस्व स्थापन झाले आहे. देशातील ऊर्जा क्षेत्रातील १२,००० कोटी रुपयांहून अधिकचा हा ताबा व्यवहार आहे.
कर्जाचा भार कमी करण्यासाठी काही जलविद्युत प्रकल्प विकण्याच्या तयारीत जेपी समूह गेल्या अनेक महिन्यांपासून होता. यासाठी कंपनीची अबुधाबीस्थित नॅशनल एनर्जी कंपनीबरोबरच चर्चाही सुरू होती. ती अगदी अंतिम टप्प्यात येत असतानाच खरेदी-विक्री दरावरून फिस्कटली. अखेर समूहाने रिलायन्सबरोबर यासाठीचा यशस्वी व्यवहार रविवारी पार पाडला.जेपी समूहातील जयप्रकाश असोसिएट्सची जयप्रकाश पॉवर व्हेंचर या उपकंपनीच्या अखत्यारीतील सर्व तिन्ही जलविद्युत प्रकल्प रिलायन्स- अनिल धीरुभाई अंबानी समूहातील रिलायन्स पॉवर या उपकंपनीच्या रिलायन्स क्लिनजेन कंपनीकडे आले आहेत. अबुधाबीच्या कंपनीने दोन प्रकल्प खरेदी करण्याची तयारी दर्शविली असताना रिलायन्स पॉवरने तिन्ही प्रकल्प आपल्या ताब्यात घेतले आहेत.
या व्यवहारामुळे रिलायन्स पॉवर ही देशातील खासगी क्षेत्रातील जलविद्युत प्रकल्पातील आघाडीची कंपनी ठरली आहे. मार्च २०१५ या चालू आर्थिक वर्षअखेर कंपनीची विद्युत चलन क्षमता ७,८०० मेगाव्ॉट होणार आहे. तीनपैकी जेपीचे दोन प्रकल्प हे हिमाचल प्रदेशात (१३९१ मेगाव्ॉट), तर एक उत्तराखंडमध्ये (४०० मेगाव्ॉट) आहे; तर रिलायन्सचे सध्या ५००० मेगाव्ॉटचे जलविद्युत प्रकल्प आहेत.
खरेतर जेपी समूह आणि रिलायन्स समूहातील अनेक कंपन्यांवर कर्जाचा भार आहे. पैकी या व्यवहाराने जेपी समूहाचे आर्थिक ओझे कमी होण्याची शक्यता आहे. तर रिलायन्सला ऊर्जा क्षेत्रातील दीर्घकालीन लाभ होणार आहे. अपुऱ्या पुरवठय़ामुळे कोळसा व वायूवर आधारित ऊर्जानिर्मितीच्या तुलनेत जलविद्युत प्रकल्पांमार्फत रिलायन्सला फायदा होऊ शकतो. उभय कंपन्यांनी आर्थिक व्यवहार अद्याप उघड केलेला नाही.
दरम्यान, ऊर्जा क्षेत्रातील या मोठय़ा ताबा व विलीनीकरणाच्या व्यवहारामुळे सोमवारच्या व्यवहारात मुंबई शेअर बाजारात रिलायन्स समूहातील ऊर्जा कंपनीचा समभाग चार टक्क्यांहून अधिकने उंचावला. दिवसअखेर रिलायन्स पॉवरच्या समभागाला ३.४७ टक्के अधिक भाव मिळत तो ९४ रुपयांवर गेला. सत्रात तो ४.१८ टक्क्यांनी वधारत ९४.६५ पर्यंत गेला होता; तर जेपी समूहातील जयप्रकाश असोसिएट्स व जयप्रकाश पॉवर व्हेन्चर लिमिटेड हे अनुक्रमे २.९५ व ३.१७ टक्क्यांनी वधारले.