रेलिगेअर इन्व्हेस्को म्युच्युअल फंडाने ‘रेलिगेअर इन्व्हेस्को ग्लोबल इक्विटी इन्कम फंड’ ही योजना गुंतवणूकदारांना खरेदीसाठी १५ एप्रिलपासून खुली केली आहे. ‘फंड्स ऑफ फंड’ धाटणीची ही योजना असून, गुंतवणूकदारांकडून उभा राहणारा निधी ‘इन्व्हेस्को ग्लोबल इक्विटी इन्कम फंडा’च्या युनिट्समध्ये गुंतविला जाणार आहे. ही नवीन योजना येत्या २८ एप्रिल २०१४ पर्यंत प्रारंभिक गुंतवणुकीस खुली असेल.
लक्झेम्बर्गस्थित ‘इन्व्हेस्को ग्लोबल इक्विटी इन्कम फंडा’ची २८ फेब्रुवारी २०१४ अखेर ५२५.२३ दशलक्ष अमेरिकी डॉलर एवढी गंगाजळी (गुंतवणूकयोग्य मालमत्ता) असून, या फंडातून वेगवेगळ्या अर्थव्यवस्था असलेल्या देशांमध्ये गुंतवणूक केली जाते. ‘रेलिगेअर इन्व्हेस्कोचा हा नवीन फंड परदेशात काही गुंतवणूक करू इच्छितात अशा भारतीय गुंतवणूकदारांसाठी सुरुवात म्हणून एक उत्तम संधी बहाल करतो, असे या संबंधाने बोलताना रेलिगेअर इन्व्हेस्को म्युच्युअल फंडाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्याधिकारी सौरव नानावटी यांनी सांगितले.
रेलिगेअर इन्व्हेस्को हे फंड घराणे ३१ मार्च २०१४ अखेर एकूण १४,४९५.९२ कोटी रुपये मालमत्तेचे व्यवस्थापन पाहात आहे.