८०० सीसी इंजिन क्षमतेच्या मारुती, ह्य़ुंदाई, टाटा यांच्या वाहनांना फ्रेन्च बनावटीच्या रेनॉने कडवे आव्हान उभे केले आहे. ३ ते ४ लाख रुपयांची नवी क्विड ही या श्रेणीतील कार कंपनी येत्या दसरा- दिवाळीच्या तोंडावर रस्त्यावर उतरविणार आहे.
टाटा मोटर्सने ३ लाख रुपयांच्या घरातील नवी नॅनो मंगळवारीच सादर करून मारुतीच्या ८०० बरोबरची स्पर्धा नव्या दमाने सुरु केली. त्यातच रेनोने आता ४ लाख रुपयांच्या आतील नवीन वाहन सादर करत ही स्पर्धा आणखी तीव्र केली आहे.
८०० सीसी इंजिन क्षमतेची पेट्रोल इंधनावर धावणाऱ्या या कारचे बुधवारी रेनॉ समूहाचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी कालरेस घोस्न यांनी चेन्नईत दिमाखदार समारंभात अनावरण केले. या वाहन निर्मितीसाठी कंपनीने ३,००० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.
१,००० सीसी इंजिन क्षमतेपेक्षा कमीच्या प्रवासी वाहन बाजारपेठेत यामाध्यमातून आणखी एक कंपनी शिरकाव करत आहे. सध्या या श्रेणीत मारुती सुझुकीचा वरचष्मा आहे. तर दुसऱ्या स्थानावर कोरियाच्या ह्य़ुंदाई कंपनी आहे.
टाटाची नवे रूप घेऊन सादर करण्यात आलेल्या नॅनो व मारुती सुझुकीच्या अल्टो ८०० कारमध्ये केवळ ५०,००० रुपयांची तफावत आहे. तर ह्य़ुंदाईची या श्रेणीतील इऑन ३ लाख रुपयांपुढे आहे. रेनोने तिच्या नव्या क्विडची किंमतही याच दरम्यान केल्याने स्पर्धा आणखी तीव्र होणार आहे.
नव्या वाहन श्रेणीत रेनॉ आपले स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न क्विडद्वारे करत असून भारतीय बाजारपेठेत ५ टक्के हिस्सा राखण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचे कालरेस यांनी यावेळी सांगितले. कंपनीच्या हे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी नवी क्विड सिंहाचा वाटा राखेल, असेही ते म्हणाले. रेनॉचा सध्या १.५ टक्के बाजारहिस्सा आहे. कंपनीची गेल्या आर्थिक वर्षांतील विक्री निम्म्यावर येत ४,००० वर आली आहे. नवी क्विड रेनॉ-निस्सानच्या भागीदारीतून तयार करण्यात आली आहे. हॅचबॅक प्रकारात त्यांची  पल्स ही ५ लाखांच्या घरातील कार अस्तित्वात आहे.

रेनॉ समूहाचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी कालरेस घोस्न यांनी छोटेखानी क्विडचे बुधवारी चेन्नईत जागतिक अनावरण केले.