केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर बुधवारी रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरांत पाव टक्क्यांची कपात जाहीर करण्यात आली. यापूर्वी ७.७५ टक्क्यांवर असणारे रेपो दर आता ७.५० टक्क्यांवर आणण्यात आले आहेत. त्यामुळे सामान्यांच्यादृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या गृहकर्जाच्या हप्त्यांमध्ये घट होण्याची मोठी शक्यता निर्माण झाली आहे. यापूर्वी १५ जानेवारी रोजी आश्चर्यकारक पाव टक्क्याची रेपो दरकपात करत रिझर्व्ह बँकेने सामान्य गृहकर्जदारांना काहीसा दिलासा दिला होता. त्यानंतर पुन्हा एकदा रेपो दरांत घट होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. मात्र, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी अर्थविषयक ठोस आकडेवारीनंतर आल्यानंतरच ही कपात करण्यात येईल असे सांगितले होते. अखेर बुधवारी रेपो दर कमी करत रिझर्व्ह बँकेने सामान्यांना एकप्रकारे खुशखबरच दिली. रिझव्‍‌र्ह बँकेचे आगामी पतधोरण ९ एप्रिल रोजी सादर होणार आहे. नव्या आर्थिक वर्षांतील हे पहिले पतधोरण असेल.

व्याजदर कपातीबाबत निर्णय त्या त्या बँकांनीच घ्यावा..
रिझव्‍‌र्ह बँकेने गेल्या महिन्यात रेपो दरात पाव टक्का करूनही केवळ दोनच बँकांनी त्यानुसार त्यांच्या व्याजदरात कपात केली होती. मात्र आम्ही बँकांना व्याजदर कपातीचे आदेश देऊ शकत नाही, असे गव्हर्नर राजन यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले होते.
बँकांमधील परस्पर स्पर्धाच त्यांना हे पाऊल उचलण्यास भाग पाडू शकेल. त्यामुळे आता फक्त वाट पाहणे एवढेच आपल्या हातात आहे. बँकांच्या नित्य निर्णयात रिझव्‍‌र्ह बँकेच्या हस्तक्षेपाची गरज नसून, व्याजदर कपातीसारखा निर्णय संबंधित बँकांच्या व्यवस्थापनांनीच घ्यायचा आहे. बँकांची व्याजदर कपातीची इच्छा असून, येणाऱ्या कालावधीत ते प्रत्यक्षात निश्चितच दिसून येईल.