सर्वसमावेशक बँक परवान्यासाठीचा नवीन मार्गदर्शक मसूदा रिझव्‍‌र्ह बँकेने गुरुवारी प्रसिद्ध केला. बँक सुरू करणाऱ्या इच्छुकांना किमान भांडवल मर्यादा ५०० कोटी रुपये निश्चित करण्यात आली आहे. या मसुद्यावर येत्या ३० जूनपर्यंत रिझव्‍‌र्ह बँकेनेो सूचना-हरकती मागविल्या आहेत.
सध्या नव्या बँकांना परवान्याची मागणी रिझव्‍‌र्ह बँकेकडे नियमित स्वरूपात करता येत नाही. या आराखडय़ामुळे आता इच्छुक वित्त कंपन्यांना केव्हाही अशा बँक परवान्यांसाठी रिझव्‍‌र्ह बँकेकडे अर्ज करता येईल. सर्वव्यापी बँक परवान्यासाठीचे अर्ज रिझव्‍‌र्ह बँकेमार्फत नियुक्त स्थायी व्यवहार समिती पडताळेल. त्यानंतर ते रिझव्‍‌र्ह बँकेकडे मंजुरीसाठी जातील.
स्थानिकांचे नेतृत्व असलेल्या (विदेशी भागीदारी मर्यादित) सध्या अस्तित्वात असलेल्या बिगर बँकिंग वित्त कंपन्या अशा प्रकारच्या परवान्यांसाठी अर्ज करू शकतील. त्यासाठी त्यांचा वित्त क्षेत्रातील गेल्या दशकाचा यशस्वी प्रवास लक्षात घेतला जाईल. अर्ज करणाऱ्या समूह, कंपनीची मालमत्ता ५,००० कोटी रुपयांपेक्षा अधिक हवी.