ठेवींच्या व्याज दरात घट अटळ!

रिझव्‍‌र्ह बँकेने बुधवारी रेपो दरात केलेल्या पाव टक्का कपातीने घर अथवा वाहनासाठी कर्ज घेऊ इच्छिणाऱ्यांना दिलासा मिळण्याबाबत स्पष्टता नसली तरी बँकांमध्ये मुदत ठेवी करणाऱ्यांना मात्र कठीण काळ अपरिहार्य दिसून येतो. सेवानिवृत्तीचा लाभ बँकांमध्ये ठेवरूपात ठेवणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि अन्य गुंतवणूकदारांना याचा मोठा फटका बसणार आहे.

बँकिंग अग्रणी भारतीय स्टेट बँकेने रिझव्‍‌र्ह बँकेचे पतधोरण जाहीर होण्यापूर्वीच सोमवारी आपल्या बचत खात्यावरील व्याज दरात कपात केली. खात्यात एक कोटी रुपयांपेक्षा कमी शिल्लक असणाऱ्या खातेदारांना यापुढे चार टक्क्यांऐवजी ३.५ टक्के व्याज दर देण्याचा निर्णय बँकेने घेतला. गेल्या सहा वर्षांतील बँकेने बचत खातेदारांना देऊ केलेला हा सर्वात कमी व्याजाचा दर असून, तिच्या ९० टक्के खातेदारांना याचा फटका बसणार आहे.

मुदत ठेवींबाबत सध्या बहुतांश बँकांकडून वार्षिक ६.७५ टक्क्यांचा व्याज दर दिला जातो. अधिक मुदतीच्या ठेवींवर तर यापेक्षाही कमी व्याज दर बँका देतात. रिझव्‍‌र्ह बँकेच्या रेपो दर कपातीने या तुटपुंज्या व्याज दरातही बँकांकडून लवकरच कपात केली जाईल. ज्येष्ठ नागरिकांच्या ठेवींसाठी बहुतांश बँका पाव ते अर्धा टक्का वाढीव व्याज दर देत असल्या तरी, बँक ठेवींवरील लाभ हा करपात्र असल्याने प्रत्यक्षात परतावा दर हा पाच टक्क्यांच्या आसपास राहतो. याच पातळीवर चलनवाढीचा दरही असल्याने प्रत्यक्षात ठेवींवरील परतावा दर शून्यवत होतो.

पर्याय काय?

घसरत्या व्याज दराच्या काळात बँकांमध्ये जमा पुंजी राखणे आकर्षक राहिलेले नाही. केवळ या पैशांचा सांभाळ होईल, भांडवलवृद्धीसाठी बचतदारांना अन्य पर्याय शोधणे भाग ठरेल. ज्येष्ठ नागरिकांना (साठीपुढील) केंद्र सरकारने सुरू केलेली नवीन प्रधानमंत्री व्यय वंदना योजनेचा पर्याय स्वीकारता येईल. एलआयसीकडून राबविल्या जात असलेल्या या योजनेतून प्रत्यक्षात ८.३ टक्के दराने त्यांना करमुक्त परतावा मिळू शकेल. या शिवाय म्युच्युअल फंडाच्या रोखे तसेच लिक्विड योजनांचा मार्गही गुंतवणूकदारांना स्वीकारण्याचा वित्तीय नियोजकांचा सल्ला आहे. त्यांच्या मते, बँक ठेवींपेक्षा किमान दोन टक्के अधिक परतावा, शिवाय तुलनेने अधिक रोकडसुलभ ही गुंतवणूक ठरेल.

कर्जदारांइतकेच बचतदारही महत्त्वाचे!

बचत खात्यावरील व्याज दर कमी करण्याच्या स्टेट बँकेने टाकलेल्या पावलाचे अन्य वाणिज्य बँकांकडून अनुकरण केले जाणे अपेक्षित असताना, खासगी क्षेत्रातील कोटक महिंद्र बँकेने मात्र तसे करणार नसल्याचे गुरुवारी स्पष्ट केले. कर्जदारांइतकेच तिचे बचतदारही महत्त्वाचे असल्याचे बँकेने स्पष्ट केले आहे. कोटक बँकेकडून यापुढेही खात्यात एक लाखापर्यंत शिल्लक असणाऱ्यांना वार्षिक पाच टक्के तर त्यापेक्षा अधिक; परंतु एक कोटी रुपयांपर्यंत शिल्लक असणाऱ्या खातेदारांना वार्षिक सहा टक्के व्याज दर कायम ठेवला जाईल, असे स्पष्ट केले. केवळ एक कोटी ते पाच कोटी रुपये बचत खात्यात असणाऱ्यांना सहा टक्क्यांऐवजी अर्धा टक्का कमी ५.५ टक्के व्याज दर बँकेने लागू केला आहे. तथापि व्याज दरात फेरबदलाचा बँकेच्या ९९.९ टक्के खातेदारांवर कोणताही परिणाम होणार नसल्याची पुस्तीही बँकेने जोडली आहे.

स्टेट बँकेच्या ठेवींवरील दर कपातीचे अर्थमंत्र्यांकडून समर्थन

नवी दिल्ली : स्टेट बँकेने बचत खात्यात एक कोटी रुपयांपेक्षा कमी शिल्लक असणाऱ्या खातेदारांना यापुढे चार टक्क्यांऐवजी ३.५ टक्के व्याज दर देण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी गुरुवारी बिनदिक्कत समर्थन केले. कर्जावरील व्याज दरात कपातीच्या अनुषंगानेच बँकेने हा ठेवीदरात कपातीचा निर्णय घेतला असल्याचे ते म्हणाले. ज्येष्ठ नागरिक आणि सेवानिवृत्तांना या व्याज दर कपातीचा फटका बसेल, असा मुद्दा लोकसभेत शून्य प्रहरादरम्यान काही खासदारांनी उपस्थित केला. त्यावर, ज्येष्ठ नागरिकांच्या हितरक्षणासाठी सरकारने आधीच प्रधानमंत्री व्यय वंदना योजना सुरू करून आठ टक्क्यांहून अधिक निश्चित व्याज दर लाभाची तरतूद केली असल्याचे जेटली यांनी उत्तर दिले. एलआयसीकडून डिसेंबर २०१६ पासून अंमलबजावणी सुरू असलेल्या या योजनेतून ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या गुंतवणुकीवर ८.३ टक्के दराने परतावा मिळविता येऊ शकेल, अशी त्यांनी पुस्ती जोडली. तीन वर्षांपूर्वीपर्यंत बँकांच्या मुदत ठेवीवर ९ ते १० टक्के व्याज दर बँका देत असत, आज तो व्याज दर जेमतेम सहा टक्क्यांवर आला असल्याची विरोधक खासदारांची तक्रार होती.