मॉलमधील खरेदीवर विविध रकमेच्या देयकांसाठी वेगवेगळा वस्तू व सेवा कर (जीएसटी) आकारला जात असल्याने, एकत्रित देयकाऐवजी, छोटय़ा रकमेची वेगवेगळी देयके भरण्याची समाजमाध्यमावरील चर्चा निर्थक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

किरकोळ विक्रेत्यांची देशव्यापी संघटना असलेल्या ‘रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडिया’ (आरएआय) ने याबाबत स्पष्ट केले आहे की, मॉलमधून केलेल्या प्रत्येक वस्तूवरील कररचना निराळी असून एकत्रित देयकावर कोणताही कर लागू होत नाही.

डी-मार्टच्या नावासह मॉलमधून खरेदी केलेल्या १,००० रुपयांवरील प्रत्येक टप्प्यावर भिन्न वस्तू व सेवा कर लागू होत असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून समाजमाध्यमांमधून होत आहे. १,००० रुपयांवर शून्य टक्के, १,००० ते १,५०० रुपयांवर २.५ टक्के, १,५०० ते २,५०० रुपयांवर ६ व २,५०० ते ४,५०० रुपयांवर १८ टक्के वस्तू व सेवा कर लागू होतो, असे निरोप फिरत आहेत.

ही माहिती खरी असल्याचे मानून ग्राहकही स्वतंत्र देयक मागू लागले आहेत; हा वेळेचा आणि देयकासाठी कागदाचा अपव्यय असल्याचेही संघटनेने म्हटले आहे. मॉलमधून खरेदी केलेल्या अनेक वस्तूंच्या किमती या वस्तू व सेवा करानुसार कर अंतर्भूत करूनच आहेत, असेही नमूद करण्यात आले आहे.

हॉटेलमधील खानपानाबाबत करसंभ्रम निर्थक

खानपान सेवा देणाऱ्या विविध प्रकारच्या हॉटेलमध्ये नव्या वस्तू व सेवा प्रणालीनंतर कुठेही २८ टक्के कर लागू होत नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. या व्यवसायासाठी केवळ तीनच करांचे टप्पे असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. वार्षिक ७५ लाख रुपयांची उलाढाल असलेल्या व कर सवलतीचा लाभ घेणाऱ्या हॉटेलमध्ये ५ टक्के, वातानुकूलित नसलेल्या व मद्य पुरवठा सुविधा नसलेल्या हॉटेलमध्ये १२ टक्के तर अंशत: अथवा पूर्णत: वातानुकूलित यंत्रणा असलेल्या हॉटेलांना १८ टक्के कर लागू आहे. वस्तू व सेवा कर हा खाद्यपदार्थावर लागू असून मद्य विक्रीवर पूर्वीप्रमाणेच मूल्यवर्धित कर लागू असेल, असे केंद्रीय उत्पादन शुल्क मंडळाने म्हटले आहे. दरम्यान, वस्तू व सेवा करावरून आदरातिथ्य क्षेत्राला असलेल्या शंकांबाबत गुरुवार, १३ जुलैला नरिमन पॉइंट येथील ट्रायडेंट हॉटेलमध्ये मार्गदर्शनपर चर्चासत्र योजण्यात आले असल्याची माहिती ‘हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया’चे अध्यक्ष दिलीप दातवानी यांनी दिली आहे.