निवृत्तिपश्चात जीवनासाठी तजवीज म्हणून कमावत्या वयातच गुंतवणूक करावी लागते. ही गुंतवणूक बहुधा पगारदार म्हणून सक्तीने होणारी कर्मचारी भविष्य निधी (ईपीएफ) मार्फत आणि त्याउपर झालीच तर पीपीएफमार्फत होते. तथापि ताजा कल पाहता या गुंतवणुकांतून परतावा उत्तरोत्तर घटत जाणार आहे. या गुंतवणुकांतून जरी हमी दिलेला परतावा मिळाला तरी तो महागाई दराला मात देईल इतका नसेल. १९९० साली ईपीएफवर असलेला १२ टक्के व्याजदर सध्या ८.८ टक्क्यांवर उतरला आहे. तर पीपीएफचा सद्य व्याज दर ८.१ टक्के आहे. त्यामुळे निवृत्तिपश्चात जीवनशैलीच्या गरजा भागविणारा कोष बनविण्यासाठी या गुंतवणुकांचे पर्याय निश्चित भरवशाचे नाहीत.

मग महागाई दराला मात देईल अशी गुंतवणूक कोणती? महागाई दर हा ग्राहक किंमत निर्देशांकाआधारे मोजला जातो त्याचा गत दशकभरात विशेष भडका झाल्याचे आपण अनुभवले असून, या काळात तो सरासरी ८ टक्के राहिला आहे. त्यामुळे अर्थातच तुमच्या गुंतवणुकीने यापेक्षा सरस म्हणजे किमान दोन अंकी परतावा कमावणे भाग ठरते. दीर्घकाळात असा महागाईला वरचढ परतावा देऊ  शकेल अशा गुंतवणूक पर्यायांमध्ये तुमची बचत विभाजित होणे मग क्रमप्राप्त आहे. यापैकी एक दीघरेद्देशी पर्याय हा थेट समभागांत किंवा म्युच्युअल फंडामार्फत समभागसंलग्न (इक्विटी) फंडात गुंतवणुकीचा निश्चितच असायला हवा. काही सनातनी गुंतवणूकदार अत्यंत जोखमीचे म्हणून समभागांपासून फटकून राहतात. पण तसे पाहता प्रत्येक गुंतवणूक पर्यायात जोखीम असतेच. जसे मुदत ठेवींमधील गुंतवणुकीने कमावलेला व्याज परतावा त्याला बसणारी करांची कात्री लक्षात घेता प्रचलित महागाई दरापेक्षा वरचढ ठरणे अवघडच. निश्चित परताव्याची सुरक्षितता जरूर आहे, पण परतावा पुरेसा नाही, ही जोखीम बहुतांशांच्या ध्यानातच येत नाही.

म्हणून तुमच्या दरमहा खर्चवजा जाता शिल्लक उत्पन्नाचा काही हिस्सा समभाग गुंतवणुकीकडे वळणे आवश्यक आहे. याच पर्यायात लाभाची शक्यता ही अन्य कोणत्याही पर्यायांच्या तुलनेत जास्त आहे हे सर्वमान्यच आहे. नियत स्वरूपात मिळणारा लाभांश आणि दीर्घावधीत भांडवलवृद्धी असे समभाग गुंतवणुकीचे दुहेरी लाभ आहेत. सद्य  काळ भांडवलवृद्धीसाठी सर्वोत्तम गुंतवणुकीचा काळ आहे. समभागांमध्ये गुंतवणूक करून आपण देशाच्या अर्थव्यवस्थेत वाटा असणाऱ्या कंपन्यांसाठी भांडवल पुरवीत असल्याने, त्या त्या समयीच्या आर्थिक आवर्तनांत सर्वाधिक संपत्ती निर्माण करणाऱ्या कंपन्यांतील गुंतवणुकीचेही आपण थेट लाभार्थी ठरत असतो. अल्प आणि मध्यम कालावधीत समभाग गुंतवणूक वध-घटीचे अनुभव देत धाकधूकही निर्माण करेल. परंतु दीर्घ कालावधीसाठी गुंतवणुकीचा विचार असेल तर अधूनमधून अनुभवास येणारे हे चढ-उतार दुर्लक्षित करणेच सोयीचे ठरेल.

लार्ज कॅप अर्थात आघाडीच्या समभागांमध्ये गुंतवणूक करणारे फंड हे तुलनेने अल्प जोखीम असलेले असल्याने निवृत्ती नियोजनांत फिट्ट बसणारे आहेत. बरोबरीनेच काही रक्कम ही मिड कॅप आणि स्मॉल कॅप समभागांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या फंडांमध्ये करणे थोडे जोखमीचे जरी असले तरी त्यांतून दमदार परताव्याची शक्यताही मोठी असते हे ध्यानात घ्यावे. जसजसे निवृत्तीचे वय जवळ येत जाईल, तसतसे समभाग गुंतवणुकीवर भर हळूहळू कमी करून, त्यातून जमा झालेले भांडवल हे स्थिर रूपात व तुलनेने सुरक्षित परतावा देणाऱ्या डेट फंडांतील गुंतवणुकीकडे वळते करायला हवे. जेणेकरून बाजारातील चंचलतेचा तुमच्या निवृत्तिपश्चात कोषाला धक्का लागणार नाही.

निवृत्ती हा जीवनाचा असा टप्पा असतो, जेथे अनिश्चिततेला थारा असता कामा नये आणि प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट ही ना कमी ना जास्त अशी परिपूर्ण रूपात असणे गरजेचे असते. हे जितके ज्येष्ठांच्या जीवनाबाबत तसेच ते त्यांच्या आर्थिक स्थितीलाही लागू होते. उत्तर आयुष्यातील ही परिपूर्णता आपल्या आर्थिक गरजा आणि स्रोतांवरही संपूर्ण नियंत्रणाद्वारेच शक्य आहे. एखादी व्यक्ती सेवानिवृत्ती स्वीकारतो तेव्हा त्याला आपल्या नियमित कामापासून मोकळीक मिळते, पण त्याच्या आर्थिक जबाबदाऱ्या मात्र कायमच असतात. कामापासून मोकळीक मिळविताना दरमहा हाती पडणारे वेतनही जाणार आणि या गमावलेल्या कमाईची जागा घेणारे पर्यायी स्रोतांसाठी आयत्या वेळी धडपड न करता, त्याबाबतचे नियोजन खूप आधीपासून केले जायला हवे. त्यामुळे सुखासीन व शांतचित्त निवृत्ती जीवनासाठी पुरेसे आर्थिक स्रोत मिळवून देणारा गुंतवणूक पर्याय आपण सुज्ञपणे निवडला पाहिजे.

(लेखक हे एचडीएफसी लाइफच्या निवृत्तिवेतन व्यवस्थापन कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.)

निफ्टी निर्देशांकावर आधारित फंडात जर कोणी २००० सालात दरमहा एसआयपी धाटणीने १५ वर्षांसाठी गुंतवणूक केली असेल, तर आज त्याला वार्षिक सरासरी १२.५ टक्के दराने भांडवलवृद्धी साधणारा परतावा मिळला असेल. या परताव्यात मधल्या काळात लाभांश रूपाने पडलेली भर गृहीत धरलेली नाही. याच काळात १० वर्षे मुदतीच्या सरकारी रोख्यांतील गुंतवणुकीतून त्याने जितका परतावा मिळविला असता, त्या तुलनेत ४०० टक्क्य़ांहून अधिक परतावा देणारी ही समभाग गुंतवणूक ठरली आहे.