वस्तूंच्या दरातील जागतिक घसरण आणि चलनातील अस्थिरतेमुळे टाटा समूहातील कंपन्यांच्या महसुलात गेल्या आर्थिक वर्षांत घसरण झाली आहे. तर २०१५-१६ मध्ये समूहाकडून झालेल्या भांडवली गुंतवणुकीची रक्कम मात्र ९ अब्ज डॉलरवर गेली आहे.
वर्षभरापूर्वीचा १०८ अब्ज डॉलरचा एकंदर महसूल गेल्या आर्थिक वर्षांत १०३ अब्ज डॉलरवर आला आहे. वर्षभरातील महसूल घसरणीचे प्रमाण ४.६२ टक्के नोंदले गेले. समूहातील २९ सूचिबद्ध कंपन्यांचे बाजारमूल्य वर्षभरात ७.४ टक्क्यांनी घटले आहे.
समूहाच्या ताफ्यात १०० हून अधिक कंपन्या असून पैकी आंतरराष्ट्रीय स्तरावर ७० अब्ज डॉलर महसूल राखणाऱ्या कंपन्यांचे प्रमाण ६९ टक्के आहे. ५० कोटी डॉलरहून अधिक महसूल गोळा करणाऱ्या समूहात १६ कंपन्या असून, १० कंपन्यांची उलाढाल १ अब्ज डॉलरहून अधिक आहे.
टाटा सन्सच्या ताफ्यातील १०० हून अधिक कंपन्यांची गेल्या तीन वर्षांतील गुंतवणूक २८ अब्ज डॉलर असल्याची माहिती टाटा सन्सचे अध्यक्ष सायरस मिस्त्री यांनी दिली. दक्षिण मुंबईतील एनसीपीएत शुक्रवारी सायंकाळी झालेल्या वार्षिक समूह नेतृत्व परिषदेत ते बोलत होते. समूहाचे संस्थापक जेआरडी टाटा यांच्या १०० व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित परिषदेत समूहातील विविध कंपन्यांचे मुख्य अधिकाऱ्यांपुढे मिस्त्री यांनी समूहाच्या परंपरागत कार्यसंस्कृतीत तयार करण्यात येणाऱ्या पूरक वातावरणाचे प्रारुपही सादर केले.