युरोनेट वर्ल्डवाइड इंकची उपकंपनी आणि जगातील तिसरी मोठी निधी हस्तांतरण कंपनी रिया मनी ट्रान्सफरने भारतात आपल्या व्यवसायाच्या मुहूर्तमेढीची मंगळवारी येथे घोषणा केली. वाइजमान फॉरेक्स लि., पॉल र्मचट्स लि. आणि ट्रान्सकॉर्प इंटरनॅशनल लिमिटेड या आघाडीच्या चलन विनिमय क्षेत्रातील कंपन्यांबरोबर भागीदारीतून रियाचा भारतात व्यावसायिक पसारा फैलावणार आहे.

रियाने निवडलेल्या तिन्ही भागीदारांकडे या व्यवसायातील १५ वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. त्यांचा हा अनुभव आणि स्थानिक बाजारपेठेची जाण याचा आपल्याला निश्चितच मोठा फायदा होईल, असे या प्रसंगी बोलताना रिया मनी ट्रान्सफरचे मुख्याधिकारी आणि अध्यक्ष युआन बियान्ची यांनी प्रतिपादन केले.

रियाने आपल्या जागतिक मोहिमेची सुरुवात म्हणून नवीन ‘गोल्ड स्टँडर्ड’ नावाची सेवा सुरू केली आहे, ज्यामध्ये विदेशातून प्रेषित निधीच्या भारतातील लाभार्थीला शुद्ध सोने पारितोषिक म्हणून मिळविण्याची संधी मिळेल.

रियाच्या ३० वर्धापन दिनाचे औचित्य साधून सुरू झालेल्या या योजनेत, २३ मे ते ३१ जुलैदरम्यान कंपनीकडून १ किलोग्रॅम सोने बक्षीसरूपात वाटले जाईल. भाग्यवान लाभार्थी ३० ग्रॅम वजनाचे ३० सोन्याची नाणी आणि महाबक्षीस म्हणून १०० ग्रॅम वजनाचे नाणे जिंकू शकतील.