जगभरच्या उमरावांसाठी प्रतिष्ठेची खूण ठरलेली आलिशान रोल्स रॉइस मोटारीची नवीन ‘डॉन’ ही आवृत्ती मुंबईत शुक्रवारी कंपनीचे आशिया-पॅसिफिक विभागाचे महासंचालक मायकेल  श्नायडर यांनी प्रस्तुत केली. भारतीयांना नवीन डॉन बाळगण्यासाठी ‘अवघी’ ६.२५ कोटी रुपये किंमत  मोजावी लागेल. या मूळ ब्रिटिश नाममुद्रेसाठी युरोपीय संघातून ब्रिटनचे बाहेर पडणे हे जागतिक निर्यातीला चालना देणारे ठरेल, अशी प्रतिक्रिया श्नायडर यांनी याप्रसंगी दिली. १९९८ साली रोल्स रॉइस ही बीएमडब्ल्यू या जर्मन कंपनीने ताब्यात घेतली. मात्र तिचे बोधचिन्ह आणि नाव कायम ठेवण्यात आले.

 

कोहिनूर समूहाचा शिरगाव येथे १२०० घरांचा नवीन प्रकल्प

पुणे : स्थावर मालमत्ता क्षेत्रात कार्यरत पुण्यातील कोहिनूर आणि महालक्ष्मी समूहाच्या सहयोगातून मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गालगत प्रतिशिर्डी साई मंदिराजवळ शिरगाव येथे ‘अभिमान होम्स’ नावाचा नवीन गृहप्रकल्प साकारण्यात येत आहे. सुमारे १२०० हून अधिक १ व २ बीएचके घरांचा हा गृहप्रकल्प आहे.

आकर्षक किंमत आणि सुखावह सुविधांची विकसकांनी हमी दिलेला ‘अभिमान होम्स’ औंध, बाणेर, वाकड, हिंजवडी, आकुर्डी, निगडी या परिसरापासून नजीक असणे ही या गृहप्रकल्पाची जमेची बाजू सांगितली जाते. दर्जेदार बांधकाम, उत्तम अ‍ॅक्सेसरीज व फिटिंग्जसह, सर्वोत्तम स्पोर्ट्स, फिटनेस सुविधा जोडीला हिरवाई, विरंगुळा अशा आनंदी जीवनशैलीचा सर्व ऐवज या ठिकाणी साकारण्यात येत आहे.