वध-घट हा शेअर बाजाराचा स्थायिभाव आहे. पण एकेका दिवसात ४००-५०० अंशांनी निर्देशांकाचे वर-खाली होणे हे लक्षण काही बरे नव्हे. सप्ताहारंभी सोमवारी बाजाराचा प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स ३६३ अंश वाढीने बंद झाला, तर मंगळवारी ४२ अंश घसरण, पुन्हा बुधवार १९२ अंशांची वाढ, तर गुरुवार पुन्हा घसरणीचा राहिला. तर शुक्रवारी सकारात्मक सुरुवात करणाऱ्या सेन्सेक्सला २८ हजारांची वेस हुलकावणी देणारी ठरली.
बाजाराच्या इतिहासावर नजर फिरविली तर मे महिना हा कायम दगाफटक्याचा राहिला आहे. पण चालू आणि या आधीच्या आठवडय़ाइतकी वादळी वध-घट या मेमाही बाजाराला रुळावलेल्यांनाही धसका देणारीच म्हणावी लागेल. विशेषत: मोदी लाटेची भूल म्हणून बाजाराकडे वळलेल्या नवख्या मंडळींना या मे महिन्यातील वादळी-वधघटींना बाजाराच्या नजीकच्या काळातील प्रवासातील भयंकर वळणांचा सूचक इशाराच जणू दिला आहे. बाजारात गुंतवणुकीसाठी आगामी काळ मागील वर्षभरासारखा सरळ-सपाट  नसेल, तर फक्त खाचखळगेच नाही, दऱ्याखोऱ्यांतून जाणारा राहील, हे त्यांनी समजून चालावे. मोदी सरकारच्या पुढील आठवडय़ातील वर्षपूर्तीला बाजाराचा अपशकुन निश्चित नसेल. ३ जूनच्या रिझव्‍‌र्ह बँकेचे पतधोरणात रेपो दर कपात बाजाराकडून गृहीत धरली गेली आहे. पण त्यापुढे बाजाराला गती देऊ शकतील असे काही घडेल असे सध्या तरी दिसून येत नाही. उलट बाजाराला नरमाईकडे नेणाऱ्या घटनांचाच पगडा मोठा राहील.
मोदी सरकारच्या कार्यकाळात बाजाराला ‘अच्छे दिन’ दिसले याबद्दल कुणाचे दुमत असण्याचे कारण नाही. पण मिड कॅप आणि स्मॉल कॅप समभागांनी या काळात दिलेला परतावा हा अनेकांसाठी आयुष्यभराचा अलभ्य लाभ ठरला आहे. ब्रिटानिया, भारत फोर्ज, आयशर मोटर्स (सुमारे १७५%)वाढले; अशोक लेलँड, ऑरबिंदो फार्मा जवळपास दीड पटीने वाढले; फार्मा, सीमेंट, वाहनपूरक उद्योगातील अनेक उमद्या स्मॉल व मिड कॅप श्रेणीतील समभागांनी वर्षभरात भाव दुपटीने वाढविले आहेत.

बाजारगप्पा..
 तिमाही निकालात अपवादाने व आश्चर्यकारक चांगला नफा कमावणाऱ्या कंपन्यांच्या समभागांना निकालाच्या दिनी मागणी वाढून त्यांचे भाव दमदार उंचावल्याचे आपण पाहिले. तर वाईट कामगिरी करणाऱ्या कंपन्यांच्या समभागांना अद्दल घडविली गेल्याचे दिसले. टाटा समूहातील टाटा पॉवर आणि टाटा स्टील या समभागांनी दिवसाच्या फरकाने या अनुक्रमे अनुभवाचा प्रत्यय दिला. पण शुक्रवारी निकाल येण्यापूर्वीच्या दोन दिवस आधी स्टेट बँकेचा समभाग जवळपास १० टक्क्यांनी उंचावला. प्रत्यक्षात निकाल अपेक्षा केली जात होती त्यापेक्षा सरसच आले. तरी समभाग ३ टक्क्यांनी घरंगळला. बडय़ांबाबत अपेक्षाच इतक्या मोठय़ा असतात की त्यांच्या केवळ पूर्ततेने समाधान होत नसते, हेच खरे. वर्ष पुरे करीत असलेल्या सरकारबाबत अपेक्षांनाही हेच कदाचित लागू पडताना दिसेल.

आठवडय़ाची शिफारस..
 बाजारातील मोदी लाट ओसरू लागली असताना, सर्वाधिक घसरणीची टाचणी अतीव फुगलेल्या स्मॉल-मिड कॅप समभागांच्या फुग्यालाच लागणार आहे. सरलेल्या दोन आठवडय़ांत आपण हे अनुभवले आहे. तरी काही उत्तम वृद्धिक्षमता असलेल्या निवडक मिडकॅप समभाग हेरता येण्यासारखे आहेत. येस बँक, सन फार्मा या समभागांवर मध्यम ते दीर्घ काळासाठी खरेदी करता येऊ शकेल.