रक्कम काढण्याच्या निर्णयामुळे भीती
रुपी बँकेच्या ठेवीदार आणि खातेदारांना त्यांच्या खात्यातून २० हजार रुपये काढण्याची रिझव्‍‌र्ह बँकेने दिलेली परवानगी प्रत्यक्षात अमलात आली, तर बँक अवसायनात जाण्याचा धोका असल्याचा दावा ‘रुपी बँक बचाओ कृती समिती’ने केला आहे. खातेदार आणि ठेवीदारांच्या हितरक्षणासाठी हा निर्णय घातक असून, हा निर्णय रद्द करण्यासाठी जनआंदोलन उभारण्याचा इशारा समितीने दिला आहे.
खात्यातून २० हजार रुपये काढण्याची परवानगी अमलात आली, तर बँकेची गंगाजळी सुमारे ४०० कोटी रुपयांनी कमी होईल. त्यामुळे अन्य कोणतीही राष्ट्रीयीकृत बँक रूपी बँकेचे विलीनीकरण करून घेण्यास पुढे येणार नाही. त्यामुळे तात्पुरते २० हजार रुपये मिळाल्याचा आनंद क्षणभंगुर ठरेल आणि नजीकच्या काळात बँक अवसायनात जाऊन खातेदार आणि ठेवीदारांचे उरलेले पैसेसुद्धा बुडण्याचा धोका स्पष्टपणे दिसतो आहे, असे कृती समितीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.
याबाबत बँकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष मुकुंद अभ्यंकर यांच्याशी कृती समितीचे श्रीरंग परस्पाटकी, महेश लडकत, संदीप खर्डेकर आणि भालचंद्र कुलकर्णी यांनी सविस्तर चर्चा करून हा निर्णय त्वरित मागे घ्यावा, अशी आग्रहाची मागणी केली.
मुकुंद अभ्यंकर यांनी रिझव्‍‌र्ह बँकेकडे हा विषय आग्रहपूर्वक मांडून मंजूर करून घेतला असून, प्रशासकीय मंडळातील अन्य सदस्यांचा त्यास विरोध असून, तसे पत्रही सहकार आयुक्तांना दिले असल्याचे प्रशासकीय मंडळाचे सदस्य अरिवद खळदकर यांनी कृती समितीच्या कार्यकर्त्यांशी बोलताना सांगितले आहे, याकडे खर्डेकर यांनी लक्ष वेधले आहे. खातेदार आणि ठेवीदारांचे नुकसान करणारा हा निर्णय रद्दबातल करणे गरजेचे आहे, असेही खळदकर यांनी या शिष्टमंडळाला सांगितले.
ठेवीदार आणि खातेदारांचा मेळावा घेऊन या विषयातील धोका समजावून सांगण्यात येणार आहे. खात्यातून २० हजार रुपये काढण्यास मुभा देणारा निर्णय रद्द न केल्यास जनआंदोलन उभारण्यात येणार असल्याचे खर्डेकर, लडकत, धीरज घाटे आणि गणेश घोष यांनी जाहीर केले.