डॉलरच्या समोर सलग दुसऱ्या व्यवहारात निष्प्रभ होताना रुपयाने मंगळवारच्या व्यवहारात ६४च्या तळाला स्पर्श केला. दिवसअखेर या टप्प्यापासून स्थानिक चलन सावरले असले तरी सोमवारच्या तुलनेत तब्बल ४१ पैशांनी आपटी नोंदवत रुपया पंधरवडय़ाच्या नीचांकावर येऊन ठेपला आहे. ०.६४ टक्के घसरणीसह चलन ६३.९८ वर स्थिरावले.

विदेशी चलन विनियम स्तरावर डॉलरच्या तुलनेत युरोही आता महिन्याच्या नीचांकावर आहे. ग्रीसमधील कर्जस्थितीची चिंता चलनावर दिसून आली, तर जपानी येनसमोर डॉलरही नव्याने दोन महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला आहे.
नव्या सप्ताहाची सुरुवात करताना रुपया सोमवारी अवघ्या पाच पैशांनी रोडावला होता. या वेळी तो ६३.५७ वर होता. मंगळवारची त्याची सुरुवातही ६३.६० अशा किमान टप्प्यावर सुरू झाली. सत्रात ६४च्या खालपर्यंत येताना त्याने हा स्तरही सोडला. ६४.०५ पर्यंत व्यवहारात घसरला. ६४च्या खालचा रुपयाचा यापूर्वीचा प्रवास १४ मे रोजी नोंदला गेला आहे.