डॉलरच्या तुलनेत रुपयाने बुधवारी तब्बल ३८ पैशांची झेप घेताना स्थानिक चलनाला गेल्या सव्वा महिन्याचा वरचा टप्पा मिळवून दिला. मंगळवारच्या तुलनेत रुपया ६५.५८ या २० ऑगस्टनंतरच्या स्तरावर पोहोचला.
शेअर बाजाराप्रमाणे परकी विनिमय मंचावरही आठवडय़ाच्या तिसऱ्या सत्रात तेजीचे व्यवहार झाले. सरकारी रोख्यांमधील विदेशी गुंतवणूक मर्यादा शिथिल करण्याच्या रिझव्‍‌र्ह बँकेच्या पतधोरण घोषणेचे येथे स्वागत केले गेले.
बुधवारच्या तेजीमुळे रुपया गेल्या सलग तीन व्यवहारात ५८ पैशांनी भक्कम बनला आहे. ६५.८७ च्या भक्कमतेसह व्यवहाराची सुरुवात करणाऱ्या रुपयाने मंगळवारी ६६ नजीकचा स्तर अनुभवला होता. डॉलरच्या तुलनेत अनेक स्थानिक चलन हे वाढल्याची नोंद बुधवारी झाली.