गेल्या काही सत्रांपासून डॉलरसमोर कमकुवत ठरणाऱ्या रुपयाने सोमवारी ६५ च्या खालचा तळ गाठला. सप्ताहारंभी परकी चलन विनिमय मंचावर ३१ पैशांनी घसरणारा रुपया सोमवारी ६५.१० पर्यंत घसरला. यामुळे स्थानिक चलन आता गेल्या सहा महिन्यांच्या तळात विसावले आहे. अमेरिकी अर्थव्यवस्था भक्कम बनू पाहत असल्याने डॉलरसाठीची बँका तसेच आयातदारांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. अमेरिकी फेडरल रिझव्‍‌र्हने चालू वर्षांतच व्याजदर वाढीचे संकेत देत अर्थव्यवस्था आता पूर्वपदावर येत असल्याचे नमूद केले आहे. यापूर्वी २४ मार्च रोजी रुपया ६५ च्या खाली होता. नोव्हेंबर २०१६ पासून रुपया आतापर्यंत ७१ पैशांनी खाली आला आहे. सत्रात ६४.८४ पर्यंत भक्कम बनणारा रुपया व्यवहारात ६५.१९ पर्यंत घसरला होता. दिवसअखेरही त्याचा स्तर ६५ च्या खालीच राहिला. ६५ च्या खालील रुपयाचा सोमवारचा टप्पा हा त्याचा सहा महिन्यातील किमान स्तर आहे.