गेल्या सततच्या व्यवहारात घसरणाऱ्या रुपयाने गुरुवारी एकदम झेप घेतली. डॉलरच्या तुलनेत थेट ५० पैशांनी भक्कम बनत स्थानिक चलन ६३.११ पर्यंत उंचावले. चलनाची अर्धशतकी झेप ही एकाच दिवसातील गेल्या सात महिन्यातील सर्वोत्तम ठरली.
अमेरिकी फेडरल रिझव्र्हची दोन दिवसांची बैठक कोणत्याही व्याजदर बदलाच्या निर्णयाविना संपल्याने विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी डॉलरचा ओघ येथील भांडवली बाजारात ठेवला. परिणामी, रुपया वधारण्यावर त्याचा परिणाम झाला.
डॉलरच्या तुलनेत ६३.३५ या तेजीसह गुरुवारच्या व्यवहाराची सुरुवात करणारे भारतीय चलन ६३.३९ पर्यंत वधारले. दिवसअखेर त्यात बुधवारच्या तुलनेत ०.७९ टक्क्य़ांची वाढ नोंदली गेली. गेल्या सलग तीन व्यवहारात रुपया १३२ पैशांनी घसरला आहे.
स्थावर मालमत्ता समभागांची झेप
स्थावर मालमत्ता क्षेत्रासाठी स्वतंत्र नियामक स्थापन करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारी उशिराच्या बैठकीत न झाल्याने या क्षेत्रातील भांडवली बाजारातील समभाग उंचावले. बाजारात सूचिबद्ध स्थावर मालमत्ता समभागांचे मूल्य व्यवहारात ११ टक्क्य़ांपर्यंत वधारले.
अशा प्रकारचे विधेयक यापूर्वी गेल्या ऑगस्टमध्ये राज्यसभेत आले होते. त्यानंतर ते संसदेच्या स्थायी समितीकडे फेब्रुवारी २०१४ मध्ये आले. सर्व प्रकल्पांची नोंदणी, प्रवर्तकांची इत्यंभूत माहिती, प्रकल्प आराखडा, जमिनीची विद्यमान स्थिती, विविध परवानगीची अद्ययावता आदी या विधेयकानुसार बंधनकारक करण्याचे सुचविण्यात आले आहे.
एचडीआयएल    रु. ६७.७९    +१०.७९%
अनंत राज        रु. ४६.९५    +६.४६%
डी बी रिएल्टी    रु. ५९.००    +५.०८%
यूनिटेक        रु. १५.९०    +३.९२%
इंडियाबुल्स रि.इ.    रु. ६९.९०    +३.५६%
ओबेरॉय रिएल्टी    रु. २५४.०५    +२.४७%