एस अँड पी बीएसई ५०० निर्देशांक कंपन्यांमध्ये लक्षणीय कामगिरी

एस अँड पी बीएसई ५०० निर्देशांकात अंतर्भाव असलेल्या कंपन्यांमधील  म्युच्युअल फंडांची २०१४ च्या तुलनेत मालकी दुप्पट झाली आहे.

डॉईश बँकेच्या संशोधन विभागाने प्रसिद्ध केलेल्या अहवालात ही बाब नमूद करण्यात आली आहे. म्युच्युअल फंडांच्या योजनेत एसआयपीच्या माध्यमातून होत असलेल्या गुंतवणुकीमुळे म्युच्युअल फंड आपल्या योजनेत या समभागांची नियमित खरेदी करीत असल्याने हे घडल्याचे या अहवालात म्हटले आहे.

म्युच्युअल फंडांच्या इक्विटी योजना व समभाग गुंतवणूक असलेल्या बॅलंस्ड फंडाच्या योजनेतील गुंतवणूक जुलै महिन्यात १८,२०० कोटी या सार्वकालीक मासिक उच्चांकावर नोंदली गेल्याच्या पाश्र्वभूमीवर हा अहवाल प्रसिद्ध झाला आहे.

देशांतर्गत बचतीचे संमणास २०१४ मध्ये (केंद्रात भाजपचे सरकार आल्यानंतर) भौतिक साधनांकडून अभौतिक साधनांकडे गुंतवणूकदार वळू लागले. याचा धनवंतांचा ओघ स्थावर मालमत्ता, सोने आदींकडून रोखे समभाग व म्युच्युअल फंडाकडे वळू लागल्याचा हा परिणाम आहे.

परदेशांतील आर्थिक राजकीय व भू राजकीय घटनांमुळे परकीय अर्थसंस्था भारतीय बाजारातील गुंतवणूक कमी अधिक करीत असतात. म्युच्युअल फंडांना मिळत असलेल्या एसआयपीच्या भक्कम पाठबळामुळे म्युच्युअल फंड मागील ३६ महिन्यात कायम खरेदीदार राहिल्याने अर्थसंस्था भारतीय बाजारातील हस्तक्षेपाचा बाजारावर परिणाम कमी झाला आहे.

मागील ३६ महिन्यात भारतीय अर्थसंस्थांनी १.२८ लाख कोटींची बाजारातून खरेदी केली. यातील सर्वाधिक वाटा म्युच्युअल फंडांचा होता. याच कालावधीत परकीय अर्थसंस्थांनी १.३३ लाख कोटींची खरेदी केली. एस अँड पी बीएसई ५०० निर्देशांकात आजही परकीय अर्थसंस्था प्रबळ असून या अर्थसंस्थांच्या २१ टक्के मालकीच्या तुलनेत भारतीय विमा कंपन्या व म्युच्युअल फंड यांची मालकी २१ टक्के असल्याकडे हा अहवाल लक्ष वेधतो.

या कालावधीत म्युच्युअल फंडांनी मुखत्त्वे बँका, आर्थिक सेवा उपभोग्य वस्तू औद्योगिक वापराच्या वस्तू यांची खरेदी केली तर दूरसंचार, स्थावर मालमत्ता, आरोग्यनिगा, माहिती तंत्रज्ञान उर्जानिर्मिती या क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांची विक्री केल्याचे दिसून येत असल्याचे हा अहवाल सांगतो.

भारतातील माहिती तंत्रज्ञानामुळे जो नवश्रीमंतवर्ग तयार झाला त्याला स्थावर मालमत्ता, सोने यामधील गुंतवणुकीचा फोलपणा लक्षात आल्यानंतर हा वर्ग समभाग गुंतवणुकीकडे वळल्याचे दिसून येते. समभाग गुंतवणुकीसाठी जे कौशल्य लागते ते स्थानिक पातळीवर उपलब्ध नसल्याने हा वर्ग म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीला प्राधान्य देत असल्याचे हा अहवाल नमूद करतो.