सहारा समूहाचे प्रमुख सुब्रता रॉय यांच्या जामिनासाठी रक्कम उभी करण्यात असमर्थ ठरलेल्या सहारा समूहावर मालकीच्या हॉटेल विक्रीसाठी होणाऱ्या लिलावात सहभागी होण्याची कसरत करीत आहे. सहाराने १.५५ अब्ज डॉलरना खरेदी केलेल्या लंडनमधील हॉटेलसह अमेरिकेतील दोन हॉटेलचे मूल्य आता २.२ अब्ज डॉलरवर पोहोचले आहे.

सध्या बँक ऑफ चायनाकडे तारण असलेल्या लंडनमधील ग्रॉसव्हेनर हाऊस हे आलिशान हॉटेल या बँकेनेच लिलावात विकायला काढले आहे. मात्र त्याचा मूळ मालक असलेला सहारा समूहच खरेदीसाठी या प्रक्रियेत सहभागी होत आहे.
गुंतवणूकदारांचे पैसे अन्य योजनांमध्ये वळविल्याच्या बेकायदेशीर कृत्याच्या प्रकरणात गेल्या वर्षांहून अधिक कालावधीपासून दिल्लीच्या तिहार तुरुंगात असलेल्या सहाराश्री सुब्रता रॉय यांच्या जामिनासाठी १०,००० कोटी रुपयांची रक्कम उभारण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्याचबरोबर गुंतवणूकदारांना द्यावयाच्या रकमेचा २४,००० कोटी रुपयांचा आकडाही समूहाविरुद्ध कारवाई करणाऱ्या भांडवली बाजार नियामक सेबीने काढला आहे. यासाठी समूहामार्फत गेल्या वर्षभरापासून निधी उभारण्याची तयारी सुरू आहे. मात्र त्याला अद्याप यश आले नाही. रक्कम उभारण्यासाठी समूहातील मालमत्ता विकण्याचा प्रयत्नही दोनदा असफल ठरला.
२०१० मध्ये खरेदी केलेले समूहाच्या अखत्यारीतील लंडनमधील ग्रॉसव्हेनर हाऊस या हॉटेलला सध्या बँक ऑफ चायनाने कर्ज दिले आहे. ही बँक हे हॉटेल आता आपल्या अन्य वित्त पुरवठादारांच्या सहकार्याने लिलावात काढणार असून त्यात सहाराच सहभागी होत आहे. तर या हॉटेलसाठी अबू धाबी इन्व्हेस्टमेन्ट ऑथोरिटी, चीनमधील फॉसन ग्रुप, हॉटेल्स होल्डिंग आणि एमअ‍ॅन्डजी प्रुडेन्शिअल यांनीही निविदा भरल्या आहेत.

२०१० मध्ये खरेदी केलेल्या या हॉटेलवर या लिलाव प्रक्रियेतून ताबा मिळविण्यासह सहाराश्रींसाठीची रक्कमही उभी करण्यात येईल, असा दावा समूहाच्या प्रवक्त्याने केला आहे. समूहाद्वारे कर्ज थकीत झाल्यानंतर बँक ऑफ चायनाने या हॉटेलवर दोनच महिन्यांपूर्वी ताबा घेतला होता. बँकेमार्फत सहाराला कर्जबुडवे जाहीर केल्यानंतर डेलॉईट ही स्थावर मालमत्ता क्षेत्रातील सल्लागार कंपनी हॉटेल खरेदीसाठी नेमण्यात आली होती.
लंडनव्यतिरिक्त सहारावर कर्ज असलेल्या मालमत्तांमध्ये अमेरिकेतील द प्लाझा व ड्रीम डाऊनटाऊन या दोन हॉटेलचाही समावेश आहे. २०१० ते २०१२ या दोन वर्षांत ही तीन हॉटेल्स समूहाने १.५५ अब्ज डॉलरना खरेदी केली होती. त्याची सध्याची किंमत २.२ अब्ज डॉलर असल्याचा अंदाज आहे. निधी उभारणीसाठी या तीन मालमत्ता समूहासाठी महत्त्वाच्या आहेत.
याशिवाय समूहातील मुंबई व मुंबईनजीकच्या मालमत्तांच्या विक्रीचा मार्गही अवलंबिण्यात येणार आहे. यामार्फत उभी राहणारी रक्कम सहाराश्रींच्या सुटकेसह सेबीकडेही जमा करण्याचा सहाराचा इरादा आहे. तसे समूहाच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयातही स्पष्ट केले आहे.