आयुर्वेद, होमियोपथी, युनानी, अ‍ॅक्युप्रेशर, अ‍ॅक्युपंक्चर, नॅचरोपथी, रिफ्लेक्सोलॉजी, योग, चुंबकीय उपचारपद्धती, अरोमाथेरपी, क्रिस्टल उपचारपद्धती, ऑरा उपचारपद्धती, फुले व रंगांच्या सहाय्याने केली जाणारी उपचारपद्धती, एनर्जी हिलींग वगैरे पर्यायी उपचारपद्धतींना प्रोत्साहन देणारे व्यासपीठ बनलेल्या ‘संजीवनी’ या धर्तीच्या राज्यातील सर्वात मोठय़ा प्रदर्शनाचे यजमानपद यंदा ठाण्याला मिळाले आहे. ‘संजीवनी २०१३’ आगामी वर्षांत १० जानेवारी ते १४ जानेवारी २०१३ असे पाच दिवस ठाणे पश्चिम येथील तलावपाळीसमोरच्या शिवाजी मैदानात आयोजिण्यात आले आहे. शरीरात अंगभूत असलेली नैसर्गिक रोगनिवारक यंत्रणेला बळकटी देण्यावर पर्यायी उपचारपद्धतींचा भर आहे. केवळ औषधांनी रोगाची वरवरची लक्षणे दाबून टाकण्यापेक्षा रोगावर मूळापासून घाव घालणाऱ्या या उपचारपद्धतीला म्हणून विदेशातून विशेषत: विकसित राष्ट्रांकडून प्रचंड मागणी आहे. भारतातील वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये पारंपरिकरीत्या जोपासले गेलेले हे ज्ञान, त्यातून निपजलेली वनौषधी व हर्बल उत्पादने आणि सेवा हे ‘संजीवनी २०१३’ प्रदर्शनातील जवळपास १०० स्टॉल्सद्वारे एकाच छत्राखाली उपलब्ध होत आहे. अ‍ॅक्झियन इव्हेण्ट्स अ‍ॅण्ड प्रमोशन्स, तेज ज्ञान फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या प्रदर्शनात दैनंदिन स्तरावर मोफत आरोग्य तपासण्या, वेगवेगळ्या विषयांवरील व्याख्याने आणि कार्यशाळा असे कार्यक्रमही पेरण्यात आले आहेत.