इंधनदर नियंत्रणमुक्त करण्याच्या सरकारच्या निर्णयाचे स्वागत सलग दुसऱ्या दिवशी मुंबई शेअर बाजाराने केले. तेल व वायू क्षेत्रातील समभागांच्या जोरदार खरेदीमुळे ‘सेन्सेक्स’ दोन वर्षांत प्रथमच २० हजारावर बंद झाला. तर ‘निफ्टी’ही पाव शतकी वधारणेने ६ हजाराच्या वर राहिला. इंधनदर नियंत्रणमुक्ततेच्या निर्णयामुळे विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी कालच्या प्रमाणे आजही तेल व वायू क्षेत्रातील समभागातील गुंतवणूक कायम राखली.
तत्पूर्वी ‘सेन्सेन्स’ने मंगळवारच्या व्यवहारात दोनदा २० हजाराला स्पर्श केला होता. मात्र बंद होताना तो गेल्या दोन सत्रांपासून या बहुप्रतिक्षित टप्प्याच्या उंबरठय़ावरच होता.
तेल व वायू क्षेत्रातील विशेषत: सरकारी कंपन्यांच्या समभागांची खरेदी शुक्रवारी सकाळच्या सत्रातही कायम राहिल्याने ‘सेन्सेक्स’ यावेळीच २० हजाराच्या वर गेला. सप्ताहाखेरसाठीचे व्यवहार सुरू होतानाच मुंबई निर्देशांक २०,०३८.६७ ला पोहोचला. अवघ्या तासाभरात तो २०,१२६.५५ पर्यंत पोहोचला. यावेळी त्यात कालच्या तुलनेत १२२.५९ अंशांची भर पडली. ३१.५५ अंश वाढीमुळे ‘निफ्टी’ही यावेळी ६,०७०.१५ पर्यंत गेला होता. कालच्या सत्राअखेर ६ टक्क्यांच्या वर बंद झालेले तेल व वायू विपणन क्षेत्रातील समभाग आज सकाळच्या सत्रात तब्बल १९ टक्क्यांची वाढ नोंदवित होते. एचपीसीएल, आयओसीसारख्या समभागांनी तर काल वर्षांचा उच्चांक नोंदविला होता. हे सत्र आज सुरुवातीलाही कायम होते. एकूण तेल व वायू निर्देशांक यावेळी ३.२ टक्क्यांनी उंचावला होता. दिवसअखेर ओएनजीसीमधील वाढही ७.३ टक्क्यांपर्यंत उंचावलेली राहिली. दुपारच्या सत्रातही ‘सेन्सेक्स’ही आधीच्या सत्राच्या तुलनेत शतकी वाढ नोंदवित होता. तो यावेळी गेल्या दोन वर्षांच्या उच्चांकी टप्प्यावर होता. आठवडय़ाची अखेर करताना ‘सेन्सेक्स’ ६ जानेवारी २०११ नंतर प्रथमच २० हजारावर बंद झाला. ७५.०१ अंश वाढीसह मुंबई निर्देशांक २०,०३९.०४ वर स्थिरावला. तर २५.२० अंश वधारणेने ‘निफ्टी’ ६,०६४.४० वर स्थिरावला.