येस बँक या भारतातील पाचव्या क्रमांकाच्या सर्वात मोठय़ा खासगी बँकेने अतिरिक्त संचालक (अकार्यकारी) म्हणून भारतीय स्पर्धा आयोगाचे माजी अध्यक्ष अशोक चावला यांची नियुक्ती केल्याची घोषणा केली आहे.
बँकेचे आगामी अकार्यकारी संचालक म्हणून मंजुरी देण्यासाठी येस बँकेने भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेकडे अर्जही केला आहे. सध्याच्या अकार्यकारी अध्यक्षांचा (रेणू सिंग) कार्यकाल २९ ऑक्टोबर २०१६ रोजी संपुष्टात येत असल्याने बँकेचे आगामी अकार्यकारी अध्यक्ष म्हणून अशोक चावला यांच्या नियुक्तीस मंजुरी देण्यासाठी येस बँकेने रिझव्‍‌र्ह बँकेकडे अर्जही केला आहे.
बँकेच्या वार्षकि सर्वसाधारण सभेमध्ये, कंपनी कायदा २०१३ नुसार, बँकेचे भागधारक स्वतंत्र संचालक म्हणून चावला यांची नियुक्ती विचारात घेतील. येस बँकेत येण्यापूर्वी, अशोक चावला अलिकडेपर्यंत कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाचे (सीसीआय) अध्यक्ष होते.